Nagpur News : चिमुकले बनताहेत राष्ट्रसंतांच्या कार्याचे वाहक!

हातात खंजिरी आणि मुखी भजनाच्या माध्यमातून देशभक्ती आणि ग्रामभक्तीचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याची धुरा विदर्भातील गावागावांमध्ये लहान मुले-मुली वाहत आहेत.
rashtrasant tukdoji maharaj
rashtrasant tukdoji maharajsakal

नागपूर - हातात खंजिरी आणि मुखी भजनाच्या माध्यमातून देशभक्ती आणि ग्रामभक्तीचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याची धुरा विदर्भातील गावागावांमध्ये लहान मुले-मुली वाहत आहेत. भजनांच्या माध्यमातून लहान मुले देशभक्ती, गावांचा विकास, अध्यात्म आणि विज्ञान यांचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे साहित्यात उत्क्रांतीवाद आणणारे विज्ञाननिष्ठ संत आहेत. ग्रामगीतेतील ओव्यांचे अध्ययन केले असता आपल्याला ठायी ठायी अध्यात्म, विज्ञान आणि तर्कवादाचे दर्शन होते. म्हणूनच तुकडोजी महाराज म्हणतात,

गुरूदेव ऐसी हो

दया जग का अंधेरा दूर हो।

सद्‍धर्म सूरज की प्रभासे

दंभ सारे चूर हो।।

अध्यात्म और विज्ञान के

सहयोग से सब हो सुखी।

सहयोग समता से

सही सृष्टी करे हम स्वर्ग की।।

तुकडोजी महाराजांना ईश्वर हा गिरिकंदरात अथवा मंदिराच्या गाभाऱ्यात नव्हे तर गरीब, अडाणी, निरक्षर जनतेत वसलेला दिसला. या सर्व घटकांची सेवा म्हणजेच ईश्वरी सेवा असल्याचे ते मानतात. ही सेवा करण्यासाठी महाराजांनी खंजिरी आणि भजनांचा मार्ग निवडला. भजनांच्या माध्यमातून त्यांनी समाजभक्ती आणि राष्ट्रभक्ती चेतविली तर खंजिरीच्या खड्या आवाजाने समाज जागा केला.

समाजप्रबोधनाचे महाराजांचे कार्य आजही सुरू आहे. खेड्यापाड्यांमध्ये गुरूदेव सेवामंडळाच्या माध्यमातून समाजजागृतीचे काम विविध घटक करीत आहेत. मोठ्यांची भजनी मंडळे तर आहेतच पण हा तुकडोजी महाराजांच्या समाजप्रबोधनाचा वारसा किशोरवयीन पिढी पुढे नेत आहे.

सुसंस्कार शिबिरांचे आयोजन

मुलं देशाचे भविष्य आहेत. त्यांच्यावर योग्य संस्कार झाल्यास ते पुढे सुदृढ समाजनिर्मिती करण्यास हातभार लावतील. या उद्देशाने दरवर्षी श्रीगुरूदेव सर्वांगीण सु-संस्कार शिबिरांचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात येते.

ग्रामगीता ग्रंथ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या इतर साहित्य संपदेतून मुलांना जीवन जगण्याची आदर्श दृष्टी देण्याचे आदर्श देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही संस्कारक्षम पिढी पुढे समाजाचे नेतृत्व करते आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करते.

- रविदादा मानव, संचालक, श्रीगुरूदेव अध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरी

मुलांमध्ये लपलेल्या कलाकाराचा शोध

गुरुकुल आणि संस्कार शिबिरात मुलांमध्ये लपलेला कलाकाराला शोधण्याचे आणि त्याला व्यासपीठ प्राप्त करून देण्याचे कार्य केल्या जातो. कुणी उत्तम हार्मोनियम वादक असतो तर कुणी तबला वादक! गोड गळा आणि मधूर आवाज असलेला मुलगा,मुलगी ग्रामगीतेतील भजने लीलया गातात. हीच किशोरवयीन मुले पुढे तुकडोजी महाराजांच्या विचारांचा समाजात प्रसार-प्रचार करतात.

सुसंस्कार शिबिर स्थळे

• श्रीगुरूदेव अध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरी, जि. अमरावती

• श्रीगुरूदेव सेवा मंडळ, रुई गोस्ता, जि. वाशिम

• श्रीगुरूदेव मानव मंदिर, रक्षक बाग, येरला, जि. नागपूर

• श्रीगुरूदेव सेवा मंडळ, तळेगाव मो. जि. अमरावती

• श्रीगुरूदेव साधनाश्रम, आकोली, जि. वर्धा

• मदर टेरेसा इंग्रजी शाळा, अंजनासिंगी, जि. वर्धा

श्री गुरूदेव अध्यात्म गुरुकुल म्हणजे एक विद्यापीठच!

मोझरी येथील श्री गुरूदेव अध्यात्म गुरुकुल येथून दरवर्षी शेकडो मुले-मुली तुकडोजी महाराजांची शिकवण घेऊन बाहेर पडतात. कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्यनिर्मित या गुरूकुलमध्ये उद्याची पिढी घडत आहे. हे गुरुकुल म्हणजे आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तार्किक अधिष्ठान होय. या अधिष्ठानावरून लोकजीवन सात्त्विक आणि शुद्ध करणाऱ्या पिढीची जडणघडण होते. हे गुरुकुल म्हणजे एक विद्यापीठच होय. येथे वर्ग ते पाच ते बारावीपर्यंतच्या १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

शालेय शिक्षणाबरोबरच संत साहित्य, संविधान, तंत्रज्ञान, कृषी, विविध खेळ, संगीत आदींचे ज्ञान दिले जाते. येथून बाहेर पडलेले संस्कारक्षम विद्यार्थी समाजप्रबोधनाचे कार्य करीत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com