फॉक्सकॉन देऊन मोदींना ‘रिटर्न गिफ्ट’ - अतुल लोंढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

atul londhe

शिंदे सेना आणि भाजपच्या कार्यकाळात वेदांताचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये पळवला. असे असताना हेच नेते महाविकास आघाडीवर दोष देत आहे.

फॉक्सकॉन देऊन मोदींना ‘रिटर्न गिफ्ट’ - अतुल लोंढे

नागपूर - महाविकास आघाडी सरकार पाडण्यास मदत केल्याने गुजरातला फॉक्सकॉनचा प्रकल्प देऊन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिटर्न गिफ्ट दिले का असा सवाल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेसतर्फे युवकांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे केले जाईल असाही इशारा पत्रकार परिषदेत दिला.

शिंदे सेना आणि भाजपच्या कार्यकाळात वेदांताचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये पळवला. असे असताना हेच नेते महाविकास आघाडीवर दोष देत आहे. शिंदे सरकारची स्थापन झाल्यानंतर १५ जुलै २०२२ ला राज्याच्या मुख्य सचिवांचा अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटीची बैठक घेण्यात आली होती. याचा अर्थ जुलै महिन्यात हा प्रकल्प महाराष्ट्रातच होता. या बैठकीचे इतिवृत्तही लोंढे यांनी यावेळी सादर केले.

त्यात वेदांताला दिल्या जाणाऱ्या सोयी सवलतींची व सुविधांची सविस्तर माहितीही दिली आहे. हे इतिवृत्त खोटे आहे का असेही लोंढे म्हणाले. आता स्वतःची नामुष्की टाळण्यासाठी हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्याचे आधीच ठरले होते असे दावे केले जात आहे. वेदांताचे प्रमुख अग्रवाल यांच्यावर राजकीय दबाव असावा, यामुळेच ते आधीच ठरले होते असे सांगत असावा अशी शंकाही लोंढे यांनी यावेळी व्यक्त केली.

वेदांताचा विषय राजकीय किंवा महाराष्ट्र-गुजरामधील स्पर्धेचा नाही. या प्रकल्पामुळे कोट्यवधीची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे. लाखो नोकऱ्या येथील तरुणांना उपलब्ध झाल्या असत्या. प्रकल्पाचा फिजीबिलीटी रिपोर्ट हा संपूर्णतः महाराष्ट्रासाठी अनुकूल होता. त्यामुळेच हायपॉवर कमिटीची मिटिंग घेऊन सगळे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळेच ६० हजार कोटी रुपयांची कॅपिटल सबसिडी महाराष्ट्र देणार होते. अचानक असे काय झाले की हे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेला असेही लोंढे म्हणाले.

नवा प्रकल्प जुमलाच ठरणार

वेंदाता गेल्यानंतर आता यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्यात येणार असल्याचे भाजपचे नेते छातीठोकपणे सांगत आहे. यापूर्वी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचा जुमला अद्याप जनता विसरली नाही असाही टोला लोंढे यांनी लगावला.