Nagpur : तांदूळ महागणार; अवकाळी पावसामुळे उत्पादन घटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तांदूळ

तांदूळ महागणार; अवकाळी पावसामुळे उत्पादन घटणार

नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरवात झाली आहे. बाजारात नवीन तांदूळ विक्रीसाठी दाखल होऊ लागला असताना पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी, चांगल्या गुणवत्ता असलेल्या तांदळाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात प्रति किलो तांदळाच्या दरात तीन ते चार रुपयांची वाढ झालेली आहे. तसेच नवीन हंगामात तांदळाचे भाव कमी होण्याची शक्यता धुसर आहे.

हंगामाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथून तांदळाची मोठी आवक होते. गेल्या काही वर्षांपासून तांदळाची निर्यात वाढली आहे. अमेरिका, युरोप, आफ्रिकेतून तांदळाला मागणी वाढत आहे. यंदाच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत तांदळाच्या दरात क्विंटलमागे तीनशे ते चारशे रुपयांनी वाढले आहेत. यंदा प्रतिक्विंटलचे दर ४२०० ते ५६०० रुपयापर्यंत गेला आहे. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. हंगामाच्या सुरवातीला मध्यप्रदेशातील तांदळाची आवक सुरु झालेली आहे. मात्र, शेतातील पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका बसल्याने उत्पादनाचा दर्जा कमी झालेला आहे. बिगरबासमती तांदळाची परदेशातून असलेल्या मागणीमुळे दरवाढ झाली आहे.

तांदळाच्या निर्यातीत भारताचे स्थान पहिल्या क्रमांकाचे आहे. विदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे तांदळाचे उत्पादन कमी झाले असल्याचे नागपूर किरकोळ किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. याशिवाय गहू, धान्य, खाद्य तेलाचे भाव मागणी अभावी स्थिरावलेले आहेत. एसटी बंद असल्याने ग्राहकांची बाजारातील वर्दळही कमी झालेली असल्याने सर्वच धान्याचे भाव स्थिरावलेले आहेत.

डाळीवरील निर्बंध हटविले

केंद्र सरकारने दोन जूलैला देशात डाळीच्या साठ्यावरील निर्बंध मागे घेतले आहे. या निर्णयाचा देशातील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. केंद्र सरकारने डाळीच्या आयातीच्या निर्णयाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मसूरच्या आयात शुल्क कमी केला आहे. तसेच साठ्याचे विवरण देण्याची सक्तीही सरकारने केलेली आहे. येत्या काहीदिवसात नवीन पीक बाजारात येणार आहे. त्यात सरकारने आयात करण्याच्या मुदतीत वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यांच्या पिकांना योग्य किमती मिळणार नसल्याचा आरोप दी होलसेल ग्रेन ॲण्ड सीड्स मर्चेंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी केला आहे.

loading image
go to top