
Rules for Stray Dogs: नागपूरकरांच्या श्वानप्रेमावर उच्च न्यायालयाची बंधनं; पाळाव्या लागणार नियम-अटी
नागपूरमध्ये मोकाट कुत्र्यांच्या विरोधात आता उच्च न्यायालयाने काही कठोर पावलं उचलली आहेत. मोकाट कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या श्वानप्रेमींवरही यामुळे निर्बंध येणार आहेत. मोकाट कुत्रे उचलताना प्राणी प्रेमींनी हस्तक्षेप केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
नागपूरमधील मोकाट कुत्र्यांविरोधात उच्च न्यायालयाने कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खायला घालता येणार नाही. खाऊ घालायचे झाल्यास त्यांना महापालिकेच्या परवानगीनंतर आपल्या घरी नेत खाऊ घालावे. महापालिका, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांनी याविषयी असलेल्या कायदेविषयक जनजागृती करावी लागणार. पोलिसांनी वेळोवेळी नोटीस काढाव्या. मोकाट कुत्रे रस्त्यावर दिसायला नको, असे नियम लावले आहेत.
याशिवाय मोकाट कुत्रे वाढले असल्यास नागरिकांना महापालिकेकडे तक्रार करता येणार आहे. महापालिकेने यासाठी सोशल मीडियाच्या आधारे सुविधा उपलब्ध करून द्यावी, असं या आदेशात म्हटलं आहे. राज्यशासनाने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात मंजूर केलेले १७ कोटी रुपये ८ आठवड्यांमध्ये महापालिकेला उपलब्ध करून घ्यावे. शासन व महापालिकेने मोकाट कुत्र्यांना निवारा म्हणून मोठी जागा शोधावी व तेथे मोकाट कुत्र्यांना ठेवावे. मोकाट कुत्रे उचलताना प्राणी प्रेमींनी हस्तक्षेप केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशाही काही नियमांचा यामध्ये समावेश आहे.