
अमरावती : ४ वर्षांपासून विद्यार्थ्याला डिग्रीची प्रतीक्षा
चांदूररेल्वे (जि. अमरावती) : अभियांत्रिकी पूर्ण केलेल्या शहरातील विद्यार्थ्याला अमरावती विद्यापीठातून चार वर्षांपासून डिग्री मिळत नसून डिग्री देण्यास विद्यापीठ टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता वरिष्ठ प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. अशीच समस्या मुस्लीम प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांची असल्याची माहिती आहे.
चांदूररेल्वे शहरातील रहिवासी असलेला शहजाद खान याने अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षाला एसबीसी- ए (मुस्लीम आरक्षण) या प्रवर्गातून २०१४-१५ मध्ये प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय (जुने), बडनेरा येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेत प्रवेश घेतला होता. मात्र, सदर विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसांनी हे आरक्षण रद्द करण्यात आले होते. जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागाला सादर केली होती. परंतु, मुस्लीम आरक्षण रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्याला कागदपत्रे परत करण्यात आली. आरक्षण जरी रद्द झाले तरीही प्रवेश अबाधित राहणार असल्याचे शासनाकडून तेव्हाच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, तरीही विद्यापीठ लक्ष देण्यास तयार नसल्याचे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे. या विद्यार्थ्याला अमरावती विद्यापीठातून अंतिम वर्षाची कंडिशन लिहून १९ ऑगस्ट २०१७ ला गुणपत्रिका देण्यात आली होती. याबाबत विद्यापीठाला ऑनलाइन तक्रार दिली आहे. तसेच आपले सरकार पोर्टलवरसुद्धा याबाबत तक्रार केलेली आहे.
तंत्रशिक्षण विभागाला दिले पत्र
हा विषय तंत्रशिक्षण संचालनालयाशी (डीटीई)सुद्धा संबंधित असल्यामुळे या विद्यार्थ्याने अमरावती येथील या विभागाला ऑनलाइन पत्र पाठविले आहे. तसेच या विभागातही हा विद्यार्थी स्वत: जाऊन आला. मात्र आमच्याकडे याबद्दल काहीही पत्र नाही, असे त्या विभागाकडून सांगण्यात आले.
एसबीसी-ए हा आरक्षणाचा संवर्गच रद्द झाला आहे. या विद्यार्थ्याने तंत्रशिक्षण संचालनालयाकडून आरक्षण रद्द झाल्याने प्रवेशाची वर्गवारी खुल्या संवर्गात बदलवून घ्यावी व तसे पत्र सादर करावे. आता त्याला जातवैधता मिळणार नसल्याने व डिग्री हवी असल्याने हा पर्याय आहे. न्यायालयातही तो जाऊ शकतो, तेथून त्याने अंतिम आदेश आणावे.
-मिलिंद देशपांडे, सहायक रजिस्टार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
Web Title: Sant Gadge Baba Amravati University Muslim Reservation Student Waiting For Degree 4 Years
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..