यवतमाळ : राज्यातील विद्यार्थ्यांना दिला जाणारा गणवेश यंदा प्रचंड वादग्रस्त ठरला. राज्यस्तरावरून दिलेला कापड पुरवठ्याचा कंत्राट प्रत्येक शाळेसाठी डोकेदुखीचा ठरला. गंभीर म्हणजे एकाही विद्यार्थ्याला पुरेशा मापात अन् चांगल्या दर्जाचा गणवेश मिळाला नाही. .अनेक विद्यार्थ्यांना तर गणवेशच मिळाला नाही. अखेर स्वत:च्या चुकीबाबत राज्य शासनाला उपरती झाली असून राज्य स्तरावरून गणवेश पुरवठ्याचा निर्णयच बदलण्यात आला आहे. आता पुढच्या सत्रातील गणवेश खरेदीचे अधिकारी त्या-त्या शाळा व्यवस्थापन समित्यांकडे सोपविण्यात आले आहे..समग्र शिक्षा अंतर्गत शालेय गणवेश योजना अनेक वर्षांपासून सुरळीत सुरू असताना २०२४-२५ या सत्रात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी योजनेच्या अंमलबजावणीच्या पद्धतीत अचानक बदल केला. ‘एक राज्य एक गणवेश’ असे गोंडस नाव देऊन राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी इचलकरंजीच्या एकाच कंपनीकडून कापड खरेदी करून पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. .शिवाय, हा कापड कटिंग करून शाळांना पाठविणार, त्यानंतर तो गावातील बचतगटाच्या महिलांकडून शिवून घेणार, शिलाईचे मानधन म्हणून प्रती गणवेश तुटपुंजी रक्कम, सर्वांची मापे न घेता एकाच स्टँडर्ड मापात कापलेला कापड, त्यामुळे कुणाला छोटा गणवेश तर कुणाला शरीरापेक्षा मोठा गणवेश आला, मुलींच्या गणवेशात अपुरा कापड, ओढणीचा कापड दिलाच नाही, कापडाचा दर्जा अत्यंत निकृष्ट, अर्धे शैक्षणिक सत्र झाल्यावर मिळालेले गणवेश, तेही न घालण्याजोगे... अशा अनेक प्रकारांमुळे यंदा शालेय गणवेशाचा मुद्दा वादात सापडला होता..शिक्षक संघटनांनी योजनेतील या बदलांना प्रचंड विरोध केला. मात्र त्यांचे काहीएक चालले नाही. अर्धे शैक्षणिक सत्र संपून गेल्यानंतर मात्र आता शासनाला उपरती झाली आहे. याबाबत शुक्रवारी २० डिसेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने आपला पवित्रा बदलून सुधारित शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार, आता ही गणवेश योजना पूर्वीप्रमाणेच राबविली जाणार आहे.म्हणजेच, समग्र शिक्षा अंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून येणारा पैसा हा शाळा व्यवस्थापन समितीच्या (एसएमसी) खात्यावर टाकला जाईल. त्या निधीतून गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीलाच पूर्ववत बहाल करण्यात आले आहे..रंग मात्र राज्यभरात एकसारखाचनिधी पुरवठ्यासंदर्भात गणवेश योजना पूर्ववत केली असली तरी यातही ‘एक राज्य एक गणवेश’ हे तत्त्व शासनाने कायम ठेवले आहे. कारण राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व निळा पँट हाच गणवेश एकसारखा राहील, असे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्वी शाळांना आपापल्या स्तरावर रंग, कापडाचा दर्जा याबाबत वेगवेगळे निर्णय घेता येत होते. आता ती मुभा मात्र राहणार नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.