Nagpur : अडवाणींच्या यात्रेतील पैशाचे भाजप उत्तर देईल का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : अडवाणींच्या यात्रेतील पैशाचे भाजप उत्तर देईल का?

नागपूर : कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत भ्रष्टाचाराचा पैसा लागला असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपला शुक्रवारी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी १९९० मध्ये रथयात्रा काढली होती, त्यात कुणाचा पैसा होता, हे भाजपा सांगेल काय, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे मारेकरी सुटणे ही लाजीरवाणी बाब असल्याचेही नमुद केले.

कॉंग्रेस सेवादलचे कृष्णकुमार पांडे यांचे भारत जोडो यात्रेदरम्यान निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग आज नागपुरात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. भारत जोडो यात्रेबद्दल भाजपाकडे काहीही बोलण्यासारखे नाही. त्यामुळे ते काहीही बोलतात.

गुजरात विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना त्यांनी सर्वेक्षणात कॉंग्रेस मागे असून आप व भाजपमध्येच लढत असल्याचा दावा खोडून काढला. जो पैसा देतो, त्याच्या बाजूने सर्वेक्षण दाखवले जाते,असे नमुद करीत त्यांनी गुजरात व हिमाचलमध्ये भाजप व कॉंग्रेसमध्येच खरी लढत असून आप या लढतीत कुठेही नसल्याचे सांगितले. आप भाजपची बी टीम असून एमआयएमचे खासदार असादूद्दीन ओवेसी या टिमचे सदस्य असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका देशासाठी लाजीरवाणी बाब असल्याचे सांगितले. भाजपमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया आक्रमक झाल्याबाबत विचारल्यानंतर त्यांनी ते जिथे असतात, आक्रमकच असतात, असे सांगितले.

टॅग्स :NagpurCongress