Nagpur : शरद पवार बुधवारी नागपूरमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

शरद पवार बुधवारी नागपूरमध्ये

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारपासून (ता.१७) विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून यासंदर्भात सोमवारी शहर राष्ट्रवादीच्यावतीने सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. शरद पवार चार्टर्ड विमानाने नागपूरला येत आहेत. बुधवारी दुपारी तीन वाजता शहरातील व्यावसायिकांसोबत ते रामदास पेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे चर्चा करतील. त्यानंतर साडेचार वाजता येथेच ते पत्रकारांना संबोधित करतील. साडेपाच वाजता वर्धमान नगर येथील सात वचन लॉन येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

शरद पवार विदर्भ दौऱ्यात गडचिरोली, वडसा, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. शरद पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सोमवारी गणेशपेठेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रदेश आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला नागपूर जिल्ह्याचे निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते. पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्याची सूचना त्यांनी दिली, असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापनेपूर्वी शरद पवार तीन दिवस विदर्भात होते. त्यावेळी त्यांनी अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला होता. या दौऱ्यात त्यांच्या गाडीचे सारथ्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. त्यानंतर सुमारे दोन वर्षानंतर शरद पवार विदर्भात येत आहेत.

loading image
go to top