

Nagpur District News
esakal
बाजारगाव: शिवा–अडेगाव मार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच शनिवारी (ता.२८) सकाळी सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास आणखी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर घाट रोड आगाराची एमएच १४ एचजी ८२३८ क्रमांकाची बस अडेगाव येथून प्रवासी व विद्यार्थ्यांना घेऊन बाजारगाव मार्गे नागपूरकडे जात होती. शिवा रोडवरील फन अँड फूड पार्कजवळील नागमोडी वळणावर समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स वाहनाशी धडक होण्याची शक्यता निर्माण झाली. अपघात टाळण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या खाली उतरवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.