श्रावणातील उपवास महागला; साबुदाणा, राजगीरा, भगरीच्या किंमतीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sabudana

भाज्या आणि किराणासह साऱ्याच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असताना उपवासाचे सारे जिन्नसही महागले आहेत.

श्रावणातील उपवास महागला; साबुदाणा, राजगीरा, भगरीच्या किंमतीत वाढ

नागपूर - भाज्या आणि किराणासह साऱ्याच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असताना उपवासाचे सारे जिन्नसही महागले आहेत. शेंगदाणे, साबुदाणा, भगर, राजगिऱ्याच्या दरात सरासरी १५ ते २० टक्के वाढ झालेली आहे. त्यामुळे श्रावणमासातील उपवास यंदा अधिक खर्चिक ठरणार आहे.

श्रावणमासाला सगळीकडे उत्साह असतो. भक्ती, उपासनेच्या या मासात भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. साबुदाणा, शेंगदाणा, भगर, गूळ, साखर, पेंडखजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे बाजारात आवकही मोठ्या प्रमाणात होते. किराणा किरकोळ बाजारात एक महिन्यापूर्वी साबुदाण्याचे दर ६० रुपये किलो होते. ते आता ७० रुपये झाले तर शेंगदाण्याचे दर १२० रुपयावरुन १२५ रुपये किलो झाले आहेत. ११० रुपये किलो असणारी भगर १२० रुपये किलो झाली आहे. पेंडखजूरही २०० रुपये किलोपर्यंत बाजारात उपलब्ध आहे.

देशात साबुदाण्याच्या ९० लाख बोऱ्यांचे उत्पादन झाले आहे. आता बाजारात मागणी लक्षात घेता उत्पादकांनी साबुदाण्यांची साठेबाजी सुरू केली. त्यामुळे मागणी आणि पुरवठा कमी असल्याने दर वाढ झाली आहे. सध्या तीन लाख बोरे साबुदाण्यांची विक्री होत आहे. भगर तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या लिटील मिलाईट (छोटी बाजरी) चे उत्पादन महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ, ओरिसा राज्यात २० टक्के कमी झाले आहे.

यंदा भगरीच्या दरातही वाढ झाली. गुजरातमध्ये आलेल्या पावसामुळे शेतातील भुईमुगाच्या पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन कमी झाले. त्यामुळे शेंगदाण्याच्या दरातही प्रति किलो १० ते १५ रुपयांनी वाढले, अशी माहिती डी.बी मार्टचे संचालक आदर्श सुधीर देशमुख यांनी दिली.

नवीन कंद ऑक्टोबरमध्ये येणार - गोपाल साबू

देशात ९० लाख किलो साबूदाण्याचे उत्पादन झालेले आहे. श्रावण महिन्यात अचानकच यंदा मागणी वाढलेली आहे. त्यामुळे साबूदाण्यांच्या किमतीत वाढ झालेली आहे. सप्टेंबरमध्ये नवीन कंद येऊन ऑक्टोंबर महिन्यात नवीन उत्पादन बाजारात येणार आहे. ही स्थिती लक्षात घेता साबूदाण्याच्या दरात प्रति किलो ठोक बाजारात पाच ते सात रुपयांनी तर किरकोळ बाजारात १० ते १२ रुपयांची वाढ झालेली आहे. भगरीचे उत्पादन कमी झाल्याने दरात प्रति किलो १२ ते १५ रुपयांची वाढ झाली,असे साबू ट्रेडचे व्यवस्थापकीय संचालक गोपाल साबू यांनी सांगितले.

Web Title: Shravan Uapvas Inflation Sabudana Rajgira Bhagar Rate Increase

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top