कधी भूतकाळाची सैर, कधी भविष्याचे रंगवताहेत चित्र 

file photo
file photo

नागपूर : लॉकडाउनमध्ये माणूस भिंतीत खुंटी मारावी तसा घरात गच्च बसून आहे. याला पर्यायही नाही. भय आणि चिंतेच्या या काळात स्वत:पासून तुटण्याचा धोका अधिकच. अस्वस्थ मनाची होत असलेली कोंडी फोडण्यासाठी अन्य गोष्टींशी कनेक्‍ट होण्याचा त्याचा प्रयत्न चाललेला आहे. तो कधी भूतकाळाची सैर करीत आहे. तर, कधी भविष्याचे चित्र रंगवत आहे. संवेदनशील माणसाच्या वर्तमानातील जगण्याच्या या काही नोंदी... 

टाळेबंदीच वाचतो आहे 
टाळेबंदी संपण्याची वाट बघतच टाळेबंदी वाचतो आहे. लेखनासाठी मी स्वतःला कायमच लॉकडाउन केलेलं आहे. मात्र, ही टाळेबंदी सायंकाळी संपत असे. साहित्यिक, कार्यकर्ते वा नातेवाईक येत; पण आताच्या टाळेबंदीने याही गोष्टी बंद केल्या. हे दु:ख मात्र पूर्ण नवे आहे. या टाळेबंदीचं असह्य वाचन करीत 'तत्त्वज्ञानी बुद्ध' या पुस्तकाचं तत्त्वज्ञान म्हणजे काय आणि बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचं मर्म हे प्रीऍम्बलीय प्रकरण मी पूर्ण केलं. त्यासाठी मला सलग कष्ट घेता आले. हस्तक्षेपाशिवाय संपूर्ण वेळच आपला असण्याचा अपूर्व अनुभव माझ्या अस्वस्थपणाला आला. 'भारतीयत्व आणि भारतीय तत्त्वज्ञान' आणि 'भारतीय देशीवाद कोणता?' या दोन पुस्तकांचे आराखडे तयार करण्याचे आणि संदर्भग्रंथांची जुळवाजुळव करण्याचे काम मी याच काळात केले. स्वतःला बंद करून घेऊन लेखन करण्याचा अनुभव माझी आजवरही सोबत करतो आहे. त्यामुळे या टाळेबंदीचा तसा परिणाम माझ्यातील लेखकाच्या स्वयंटाळेबंदीवर झाला नाही. पण आताच्या टाळेबंदीने हातावर पोटं असणारांची आणि अर्थव्यवस्थेची जी वाताहत चालवलेली आहे आणि दैववादाच्या मजबुतीकरणाच्या ज्या शक्‍यता जोर धरत आहेत, त्यामुळे माझ्यातील लेखकाची सर्जनशील टाळेबंदीच पार हादरून गेली आहे. यातून नवा दिवस उगवावा. पण मी हैराण आहे. ही हैराणी मला भोवतीच्या टाळेबंदीचे पुनर्वाचन करायला आणि माझ्या शब्दांना ठिणग्या व्हायला सांगते... 
-यशवंत मनोहर, 
ज्येष्ठ कवी, लेखक 

बोलीभाषेतील कवितांचा अभ्यास करीत आहे 
रोजच्या कामाच्या धकाधकीत माझं वाचन कमी झालं होतं. आता वाचन वाढविलं आहे. काही महत्त्वाचे सिनेमे बघत आहे. "विवेकाच्या कविता' हा विषय रंगमंचावर कसा आणता येईल, याचा विचार करीत आहे. महाराष्ट्रातील विविध बोलीभाषेतील कवितांचा अभ्यास करीत आहे. दरम्यान, रंगभाषा संस्थेने "रंगवेळा' कार्यक्रमाअंतर्गत मराठीतील काही अभिनेत्यांकडून सुनीताबाई देशपांडे, जी. ए. कुलकर्णी यांची पत्रे वाचून घेतली. यात मला दोन पत्रे वाचायची संधी मिळाली. काही नाटकं आणि कवितांचे व्हिडिओ केले. अभिनयाचा "रियाज'ही करीत आहे. 
-अक्षय शिंपी 
कवी, अभिनेता, मुंबई 

अधिक वाचा : बीडीओने का दिला कामावर रुजू होण्यास नकार? 
 
मुलांना जास्त वेळ देत आहे 
या काळात भरपूर वाचन होतेय. काळच अस्वस्थ करणारा आहे. त्यामुळे लेखनासाठीची किंकाळी आतून येते आणि ते आपसूकच होतेय. लेखिका नसते, त्या वेळी मी पूर्णवेळ गायिका असते. तासन्‌तास गाणं ऐकणं, गायन हेच माझं मेडिटेशन. गृहिणी म्हणून सरगुंडे, पापड करतेय. आई म्हणून जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवता येत आहे. आपली सगळी ऊर्जा अत्यंत आवडीच्या कामात वापरता येत आहे. 
-डॉ. संघमित्रा खंडारे 
कवयित्री, दर्यापूर, अमरावती 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com