Thur, Feb 2, 2023

Forest Department : वन खात्यातील पदोन्नतीला चार वर्षांपासून ‘ब्रेक’
Published on : 25 November 2022, 8:44 pm
नागपूर : राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची जवळपास २५९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे वन, वन्यजीव संवर्धन, संरक्षण, गुन्हेगारीवर आळा, रोपनिर्मिती, रोप लागवड या कामांवर परिणाम झाला आहे. विभागीय वनाधिकाऱ्यांसह सहायक वनसंरक्षकांना अद्याप पदोन्नती न मिळाल्याने ही पदे गेल्या चार वर्षांपासून रिक्त आहेत.
वनविभागात उपवनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावरील आयएफएस अधिकारी पदोन्नतीचे धोरण काटेकोरपणे पाळतात. मात्र, राज्यसेवेतील वनपाल ते सहायक वनसंरक्षक यांच्या बाबतीत तसे घडताना दिसत नाही. जवळपास ही सर्वच पदे सरळ सेवा, पदोन्नती समितीच्या बैठका न झाल्याने रिक्त आहेत. जवळपास गेल्या चार वर्षांपासून पदोन्नती समितीची बैठक झालेली नाही.