
पतीच्या आजारात जमापुंजी संपली, संसाराची `बॅटरी` गुल
नागपूर : नियती एखाद्याची किती परीक्षा घेते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पोलिओग्रस्त मंजुषा पानबुडे. एकीकडे मंजुषाचे पती दुर्धर आजाराचा सामना करीत आहे, तर दुसरीकडे चरितार्थाचे एकमेव साधन असलेला ई-रिक्षा अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे त्या बेरोजगार होऊन घरी बसल्या आहेत. ई-रिक्षाच्या बॅटरीसाठी जागोजागी हातपाय मारत आहे. ३६ वर्षीय मंजुषा पती, दोन मुले व वृद्ध सासूसह अजनी परिसरातील चुनाभट्टी झोपडपट्टीत दहा बाय दहाच्या एका छोट्याशा खोलीत राहातात.
संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना अचानक एकेदिवशी सलूनचा व्यवसाय करणाऱ्या पतीला दुर्धर आजाराने ग्रासले. आजारामुळे नियमित ग्राहक दूर जाऊन त्यांचा सलून व्यवसायही ठप्प झाला. अशा कठीण प्रसंगी पत्नीने स्वतः पुढाकार घेत ई-रिक्षा हाती घेतला. दोन वर्षांपूर्वी शासनाकडून मिळालेला ई-रिक्षा चालवून ती आपले कुटुंब पोसत आहे. दिवसरात्र रक्ताचे पाणी करत केलेली थोडीफार कमाई हॉस्पिटलमध्ये भरती पतीच्या उपचारावर खर्च झाली. मात्र तिथे व्यवस्थित उपचार होत नसल्याचे बघून मंजुषाने सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीने पतीला जामठा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
४० हजार कुठून आणायचे?
पतीला बरे करण्यासाठी धडपड सुरू असताना मंजुषाच्या ई-रिक्षाच्या बॅटऱ्याही निकामी झाल्या. त्यामुळे पाच-सहा महिन्यांपासून रिक्षा घराबाहेरच पडून आहे. नवीन बॅटऱ्या विकत घेण्यासाठी किमान ३० ते ४० हजारांचा खर्च येणार आहे. आधीच पतीच्या उपचारावर लाखाच्या वर खर्च झाला. त्यात हे नवीन संकट. त्यामुळे मंजुषा पार खचून गेली. अडचणीच्या काळात एखादा-दुसरा नातेवाईक सोडल्यास कुणीही मदतीसाठी पुढे आले नसल्याचे मंजुषाने सांगितले. मला काहीही नको, केवळ बॅटऱ्या हव्या आहेत. लवकरच शाळा सुरू होत आहे. बॅटऱ्यांची सोय झाल्यास मुलांना शाळेत पोहोचवेल. कमाई सुरू झाल्यानंतर घर चालविण्यासोबतच पतीलाही आजारातून बाहेर काढू शकेल, असे मंजुषाने सांगितले. त्या डाव्या पायाने पोलिओग्रस्त आहेत.
मला पतीच्या आजाराची तर काळजी आहेच, पण त्याहीपेक्षा अधिक चिंता बंद असलेल्या ई-रिक्षाच्या बॅटऱ्यांची आहे. सध्या उदरनिर्वाहाचे साधनच नसल्यामुळे खूप अडचण जात आहे. कुणाची मदत मिळाल्यास पुन्हा रिक्षा चालवून संसार सावरू शकेल. पतीचा उपचारही करू शकेल.
-मंजुषा पानबुडे, दिव्यांग ई-रिक्षाचालक
Web Title: Story Of Manjusha Panbude After Husband Death Struggle Drive E Rickshaw For Survival
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..