esakal | आज नभांगणात दिसणार 'सूपर पिंक मून', दुर्बिणीशिवायही पाहता येणार
sakal

बोलून बातमी शोधा

pink moon

आज नभांगणात दिसणार 'सूपर पिंक मून', दुर्बिणीशिवायही पाहता येणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आज २७ एप्रिलला अवकाशात एक विलोभनीय घटना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चैत्र पौर्णिमेची ही सुपरमून पौर्णिमा राहणार असून, वर्षातील पहिला सुपरमून असेल. या वेळेस चंद्र १४ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल. या सुपरमूनचे वैशिष्ट्य म्हणजे, पौर्णिमा २७ तारखेला असली तरी २६ आणि २८ या तिन्ही दिवशी चंद्र जवळजवळ पूर्ण दिसेल. चंद्र आणि पृथ्वीमधील या वेळेस अंतर ३५,८,६१५ किमी असेल, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

'सुपरमून'च्या वेळेस चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कमी-अधिक होत असते. कमीत कमी अंतर ३५,६,५०० कि.मी. तर दूरचे अंतर ४०,६,७०० कि.मी. एवढे असते. या वर्षीचे पृथ्वी-चंद्र सर्वाधिक कमी अंतर २६ मे २०२१ रोजी होणाऱ्या सुपरमूनच्या वेळी असेल. २६ जानेवारी १८४८ रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१६ ला चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आला होता. २७ एप्रिल आणि २६ मे रोजी होणारे सुपरमून हेदेखील खूप कमी अंतराचे राहील. परंतु, पृथ्वी आणि चंद्रातील सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल. तर, ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वांत मोठे सुपरमून होणार आहे. खऱ्या अर्थाने २७ एप्रिल आणि २६ मे २०२१ हे दोन जुळे सुपरमून आहेत. दोन्ही वेळच्या चंद्र-पृथ्वी अंतरात केवळ १५७ किमीचा फरक आहे.

पिंक मूनचा रंगासोबत काही संबंध आहे का? -

चंद्र जेव्हा जवळ येतो, तेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षाणामुळे समुद्राला मोठी भरती येते. पृथ्वीवर सजीवांची निर्मिती होण्यासाठी भरती-ओहोटीचे खूप महत्त्व आहे. परंतु, आपल्या सोबत सतत राहणारा, प्रेमाचे प्रतीक आणि धार्मिक महत्त्वाचा हा चंदामामा हळूहळू पृथ्वीपासून दूर जात आहे. भविष्यात हजारो वर्षांनी चंद्र खूप दूर जाईल आणि पृथ्वीवर ग्रहणे होणार नाहीत. भरतीचे चक्र राहणार नाही. पाश्चात्त्य लोकांनी या पौर्णिमेला पिंक मून म्हणून संबोधले असले, तरी त्याचा रंगाशी काहीही संबंध नाही. ग्रास मून, एग मून, फिश मून आणि पाश्चल मून म्हणून ओळखळे जाते. भारतीय कॅलेंडरनुसार ही चैत्र पौर्णिमा असून, या दिवशी हनुमान जयंती आहे. गौतम बुद्धाने याच दिवशी श्रीलंकेला भेट दिली होती. त्यामुळे तिथे या पौर्णिमेला 'बक पोसा' असे म्हटले जाते. सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना मोठ्या आकाराचा दिसेल. पौर्णिमेला तो तूळ राशीत असेल. सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही. परंतु, दुर्बिणीला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहू शकतो. या वेळेस चंद्र आकाराने मोठा आणि खूप तेजस्वी दिसणार असल्याने या खगोलीय घटनेचा खूप आनंद घ्यावा. सध्या कोरोना संकट आणि संचारबंदी असल्याने आपण घरूनच सुपरमून पाहावा, असे आवाहन प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.

पिंक मून का म्हणतात? -

पिंक मून हे केवळ एक नाव आहे. त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. पिंक मून या खगोलशास्त्रीय घटनेचा उल्लेख मूळ उत्तर अमेरिकन शेतकऱ्यांच्या पंचागात आहे. ज्यावेळी चंद्र अवकाशात भव्य स्थिती धारण करते त्यावेळी पृथ्वीवर वसंत ऋतूत फ्लोक्स ही फुलांची झाडे बहरतात. या झाडाला गुलाबी रंगांची मनमोहक अशी झुबकेदार फुले येतात. म्हणूनच चंद्राच्या या स्थितीला पिंक मून हे नाव सर्वश्रुत झाले.

loading image
go to top