हलगर्जीपणाचा कळस! मृतदेहाला भलत्याच व्यक्तीच्या नावाचं टॅग; दुसऱ्याच  औषधांमुळे जीव गेल्याचा आरोप 

Tag of another man body pasted on different man by hospital
Tag of another man body pasted on different man by hospital

नागपूर ः अवघ्या २४ तासांत केलेल्या दोन चाचण्या कोरोना निगेटिव्ह आल्या. यानंतर त्याच दिवशी काही वेळात कस्तुरचंद पार्कजवळच्या किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये केलेली चाचणी कोरोनाबाधित आली. अहवाल आल्यानंतर काही वेळातच रुग्ण दगावला. मृताच्या शरीराला दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचे टॅग लावण्यात आले. यामुळे शंकेला वाव आहे, अशी प्रतिक्रिया नोंदवत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावला, असा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणाची तक्रार करण्यात आली. नातेवाईकांनी गोंधळ केल्याने रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते.

लीलाधर बागडे (वय ५७) असे रुग्णाचे नाव आहे. ते तिरोडा येथील रहिवासी आहे. ३१ ऑक्टोबरला उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, याच दिवशी सकाळी एका खासगी रुग्णालयात कोरोना चाचणी केली. अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर अमेरिकन ऑन्कोलॉजी रुग्णालयात कोरोना चाचणी केली. तीसुद्धा निगेटिव्ह आली. यानंतर किंग्ज वे हॉस्पिटमध्ये केलेली चाचणी कोरोनाबाधित आढळली. 

रुग्णाला केवळ मधुमेह होता. इतर आजार नव्हते. यासाठीच त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारासंदर्भात काहीच सांगण्यात आले नाही. २४ तासांपासून रुग्णाशी संपर्कच होऊ दिला नाही. मध्यरात्री १ वाजता रुग्णाची प्रकृती गंभीर झाली असे सांगत नातेवाईकांना येथील कर्मचाऱ्यांनी बोलावले. रात्री उशीर झाल्याने मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला. रुग्णालयाचे संपूर्ण बिल दिल्यानंतरच प्रेत दाखवण्यात आल्याचे रुग्णाचे नातेवाईक अक्षय वासनिक यांनी सांगितले.

आमची चूक झाली

रात्री उशिरा मृत्यू झाल्याने मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला. सकाळी मृतदेह पाहिला असता त्यावर वसंत डहाके या व्यक्तीच्या नावाचे टॅग लावले होते. मृतदेन बागडे यांचा होता तर त्यास लावलेले टॅग डहाके यांच्या नावाचे होते. यासंदर्भात विचारणा केली असता, येथील कर्मचाऱ्यांनी चूक झाल्याची कबुली दिली. नातेवाईकांनी वसंत डहाके या व्यक्तीला झालेल्या आजाराचे औषध तर बागडे यांना दिले गेले असावे, त्यामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पोलिसांनाही हीच महिती देण्यात आल्याचे अक्षय वासनिक म्हणाले. 

रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रकाश खेतान यांच्याशी ०७१२६७८९१७५ या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही. प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहचल्यानंतर प्रवेश नसल्याचे सांगण्यात आले. चालता बोलता रुग्ण दगावला असून, डॉक्टराविरोधात कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com