esakal | डुक्करांचा बंदोबस्त लावण्यासाठी बोलावले तामिळनाडूतील पथक
sakal

बोलून बातमी शोधा

pig

डुक्करांचा बंदोबस्त लावण्यासाठी बोलावले तामिळनाडूतील पथक

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : शहरात पाळीव तसेच मोकाट डुक्करांच्या हैदोसाला आळा घालण्यासाठी महापालिकेनेने पुन्हा दोन वर्षांनंतर कंबर कसली. शहरातील डुक्करांना पकडण्यासाठी तामिळनाडूतील पथक बोलावण्यात आले आहे. दोन दिवसांत पन्नासावर डुक्कर पकडून शहराबाहेर सोडण्यात आले. त्यामुळे नाल्या काठावरील अनेक वस्त्यांतील नागरिकांना दिलासा मिळाला, त्याचवेळी डुक्करंपालकांत खळबळ माजली आहे.

शहरात उत्तर नागपुरातील नाल्यांच्या बाजूच्या वस्त्यांमध्ये डुकरांचा मोठा हैदोस आहे. याशिवाय गिट्टीखदान, हजारीपहाड या भागांमध्येही डुकरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. काही वर्षापूर्वी उत्तर नागपुरातील नाल्याच्या बाजूच्या वस्तीत डुकराने चिमुकल्याचा जीवही घेतला. अनेकदा डुकरं घरापर्यंत येतात. अंगणात खेळत असलेल्या लहान मुलांनाही धोका निर्माण झाला. मोकाट डुकरांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. महापालिकेने शहरातील डुकरं पकडून बाहेर सोडण्यासाठी तामिळनाडूतील पथक बोलावले. या पथकात २५ जणांचा समावेश आहे. १ सप्टेंबरपासून डुकरं पकडण्याच्या मोहिमेने वेग घेतला असून दोन दिवसांत पन्नासावर डुकरं पकडून शहराबाहेर सोडण्यात आले. विशेष म्हणजे महापालिकेला केवळ पथकात समाविष्ट नागरिकांचा जेवण व राहण्याची व्यवस्था करावी लागत आहे. पथक डुकरं निशुःल्क पकडून देत असल्याने महापालिकेवर अतिरिक्त भुर्दंडही नाही. पहिल्या दोन दिवसांत या पथकाने केलेल्या कारवाईमुळे वराहपालकांमध्ये खळबळ माजली आहे. पहिल्या दिवशी धरमपेठ झोनअंतर्गत गिट्टीखदान, हजारी पहाड, पांढराबोडी, केटीनगर येथील १८ तर दुसऱ्या दिवशी याच झोनमधून २८ असे एकूण ४६ वराह पकडण्यात आलेले आहे. आज तिसऱ्या दिवशीही वराह पकडण्यात आले.

मालकांकडून हल्ल्याची भीती

दोन वर्षापूर्वी महापालिकेने डुकरं पकडण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेला वराहपालकांनी आक्रमकपणे विरोध केला होता. २४ जुलै २०१९ रोजी शंभरावर नागरिकांनी डुकरं पकडणाऱ्यांवर हल्ला केला होता. त्यांना दगड, काठ्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे ही मोहीम बंद पडली. त्यानंतर कोरोनामुळेही डुकरं पकडण्याची मोहीम रखडली. आता पुन्हा हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिस संरक्षणात मोहीम

दोन वर्षांपूर्वी पथकावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पोलिस संरक्षणात मोहीम सुरू केली आहे. पथकासोबत पोलिसही आहेत. त्यामुळे यंदा ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रभारी नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी नमुद केले. शहर डुकरांपासून मुक्त करण्यासाठी ही मोहिम तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारपासून तामिळनाडू येथील पथक आणून महापालिकेने पुन्हा मोहीम सुरू केली आहे. पहिल्या व दुसऱ्या दिवशी ४६ डुकरे पकडली. ही कारवाई पोलिस बंदोबस्तात होत असल्याने वराह पालकांकडून पथकावर हल्ला होणार नाही. जोेपर्यंत शहर वराहमुक्त होणार नाही, तोपर्यंत ही मोहीम सुरू आहे. वराहमुळे शहरात अस्वच्छता निर्माण होते. तसेच अनेक आजारही उद्भवत असतात.

-डॉ. गजेंद्र महल्ले, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.

loading image
go to top