नागपूर - औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी एका गटाने केलेल्या निषेधादरम्यान एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धार्मिक ग्रंथाची प्रत जाळल्याचा आरोप दुसऱ्या समुदायाने केल्यानंतर सोमवारी दुपारपासून मध्य नागपुरातील गणेशपेठ, महाल आणि गांधीबाग परिसरात तणाव निर्माण झाला.
परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान सायंकाळी काही युवकांनी घरावर दगडफेक केल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करून लाठीचार्ज केल्याची माहिती आहे. परिसरात तणावाची स्थिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एका संघटनेच्या वतीने निदर्शनाचे आयोजन केले होते. या निदर्शनानंतर त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे एका समुदायात संतापाची लाट उसळली. त्यामुळे काही युवकांनी परिसरात येऊन आंदोलन सुरू केले.
काही युवकांकडून धार्मिक ग्रंथ जाळल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत सायंकाळी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. नंतर, महाल, कोतवाली, गणेशपेठ आणि चिटणवीस पार्कसह शहरातील विविध भागात मोठ्या संख्येने लोक जमू लागले. त्यामुळे परिसरातील दुकाने व प्रतिष्ठाने बंद करून निषेध करण्यात आला. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांना बोलावून घेतले.
दरम्यान एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळून लावत निदर्शनाचा भाग म्हणून फक्त औरंगजेबाचा पुतळा जाळल्याचे सांगितले. सायंकाळी नागरिकांचे जत्थे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले. त्यांनी परिसरात जाळपोळ व दगडफेकही सुरू केली. याशिवाय गाड्यांची तोडफोडही केली.
त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांचा वापर करीत, लाठीचार्जही केला. दगडफेकीत, पोलिसांसह अग्निशमन विभागाच्या जवान जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे. मात्र, अद्यापही परिसरात तणाव असल्याचे कळते.
परिस्थिती नियंत्रणात
मध्य नागपुरात तणावामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून जलद प्रतिसाद पथके (क्युआरटी), दंगल नियंत्रण पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) तैनात करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विविध ठाण्यांमधून अतिरिक्त पोलिस कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात वाढविला बंदोबस्त
तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही वस्त्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली असून इतर ठिकाणीही बंदोबस्त लावण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.