esakal | पोलिसांना मिळावी वेतनाच्या फरकाची रक्कम
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

पोलिसांना मिळावी वेतनाच्या फरकाची रक्कम

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर: शहर पोलिस दलातील १०,२० आणि ३० वर्षे कालबद्ध पदोन्नतीची नव्याने श्रेणी लागू करण्यात आली आहे. मात्र, बाबुगिरीने चिरीमिरीच्या हव्यासापोटी वेतनाच्या फरकाची रक्कम अडवून ठेवली असल्याची माहिती समोर आली आहे. लिपिक वर्गांच्या खाऊ धोरणामुळे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला निर्धारित वेळी कालबद्ध पदोन्नती देण्यासाठी शासनाने काही मापदंड ठरवलेले आहेत. शहर पोलिस दलांचा डोलारा जवळपास साडेआठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. पूर्वी १२ वर्षे (नायक पोलिस शिपाई), २४ वर्षे (पोलिस हवालदार) आणि ३६ वर्षे (सहायक पोलिस उपनिरीक्षक) अशाप्रकारे तीन कालबध्द पदोन्नत्या मिळत होत्या. परंतु मार्च २०१९ मध्ये आश्‍वासित प्रगती योजनेअंतर्गत सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिस खात्यात १० वर्षे पूर्ण करणाऱ्याला नायक पोलिस, २० वर्षे पूर्ण करणाऱ्याला पोलिस हवालदार आणि ३० वर्षे पूर्ण करणाऱ्यांना सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येते.

सातव्या वेतन आयोगानुसार वेतनामध्येही वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा शहर पोलिस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना झाला आहे. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांना वेतनाची तफावत रक्कम मिळणार आहे. परंतु पोलिस आयुक्तालयातील बाबुंनी फक्त चिरीमिरीसाठी ती रक्कम अडवून ठेवल्याचा आरोप अनेक कर्मचाऱ्यांनी केला आहे.

सणासुदीला मिळावी रक्कम

येत्या काही दिवसांवर पोळा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा सणापूर्वी वेतनाची फरकाची रक्कम मिळावी, अशी आशा अनेक कर्मचाऱ्यांना लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिस कर्मचारी लिपीकांंकडे चकरा मारत आहेत. मात्र, लिपीक चिरीमिरीची मागणी करीत आहेत. जे पैसे देण्यास नकार देतात, त्यांना टोलवाटोलवीचे उत्तर देत असल्याच्या तक्रारी आहेत.

सोशल मीडियावर खदखद

पोलिस आयुक्तालयातील बाबुगिरीबाबत अनेक तक्रारी आहेत. उर्वरित फरकाची रक्कम काढण्यासाठी गेल्यास लिपीक वर्ग टाळाटाळ करून परत पाठवित असल्याची खदखद अनेक पोलिसांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. पारदर्शक कारभार आणि त्वरित निर्णय घेण्यासाठी ओळखल्या जाणारे आयुक्त अमितेश कुमार यांनी कर्मचाऱ्यांच्या या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

loading image
go to top