
निकृष्ट कोळशामुळे वीजनिर्मितीत घट
नागपूर : औष्णिक वीज उत्पादन केंद्रांजवळ पुरेसा कोळसा नसल्याने वीज उत्पादन कमी होण्याची व राज्यावर भारनियमनाचे सावट असल्याचे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अकोला येथे दिले असले, तरी उत्पादन केंद्रांच्या सूत्रांकडून मात्र त्याला दुजोरा मिळाला नाही. उलट पुरेसा कोळसा आहे, परंतु सुमार गुणवत्तेच्या कोळशामुळे वीज निर्मिती घटण्याची शक्यता असल्याचे कळते.
वीज उत्पादन केंद्रांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोळशाची सध्यातरी टंचाई नाही. वॉशरीमधून कोळसा स्वच्छ होऊन येत असला तरी त्याची गुणवत्ता कमी आहे. त्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम होत असल्याचे या सूत्रांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा वीज निर्मिती प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक वीजनिर्मिती केली जात आहे. खापरखेडा येथे पाच युनिट असून त्याची वीज निर्मिती क्षमता १३४० मेगा वॅट आहे. त्यात सध्या ९३३ मेगावॉट वीज निर्मिती केली जात आहे.
कोराडी वीज निर्मिती प्रकल्पात ६६० मेगा वॅटचे तीन युनिट आहे. त्याची वीज निर्मिती क्षमता १९८० मेगा वॅट असून विद्यमान स्थितीत १६३३ मेगा वॅट वीज निर्मिती केली जात असल्याची माहिती पुढे आलेली आहे. कोराडी वीज निर्मिती प्रकल्पात सध्या ४०० टन प्रति तास कोळशाचा वापर केल्या जात आहे. अकोला जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात चार दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक आहे. मात्र, दररोज दोन रेल्वे गाड्यांनी आवश्यक तेवढा कोळसा प्रकल्पाला पुरवठा होत असल्याची माहिती पारस विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खराटे यांनी दिली. तेथे सध्या ३२ हजार मेट्रिक टन कोळसा शिल्लक आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती करणारे केंद्र आहे. या केंद्रातील सात संचातून दोन हजार ९०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. सध्या सातही संच कार्यान्वित आहे. सध्या चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्राकडे २ लाख ६४ हजार मेट्रिक टन कोळशाचा साठा शिल्लक आहे. कोळशाचा हा साठा पाच दिवस पुरू शकतो, अशी माहिती वीज केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिली.
वीज प्रकल्प - उत्पादन क्षमता - निर्मिती
कोराडी - १९८० मेगा वॅट - १६३३ मेगा वॅट
खापरखेडा - १३४० मेगा वॅट - ९३३ मेगा वॅट
चंद्रपूर - ३३४० मेगा वॅट - १७५६ मेगा वॅट
पारस - ९२० मेगा वॅट - ४०७ मेगा वॅट