
Cotton News : वेचणी चक्क हजार रुपये क्विंटल
गुमगाव : आधीच अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतातील पिके हातची गेली असताना हाताशी आलेल्या कपाशीच्या वेचणीसाठी मजुरांची टंचाई असताना शेतकऱ्यांना प्रतिकिलो १० रुपये मजुरी द्यावी लागत आहे.
त्यामुळे पिकांवर आतापर्यंत केलेला खर्च, अवकाळी पावसाने केलेले नुकसान आणि आता वेचणीचा खर्च या तिहेरी आर्थिक संकटात शेतकरी भरडून निघाला आहे.
काही ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसल्याने कापसाचे एकरी उत्पादन आधीच घटले आहे. थोड्या फार प्रमाणात समाधानकारक दर आहे पण, उत्पादन मात्र घटल्याने ‘थोडी खुशी, जादा गम’ अशी कापूस उत्पादकांची अवस्था झाली आहे.
यंदा पिकांच्या पेरणीपासून संकटाचे सत्र शेतकऱ्यांच्या मागे हात धुवून लागले आहे. अतिवृष्टीसह सततच्या पावसाने खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सततच्या पावसाने कपाशी, सोयाबीन आणि तुरीची दाणादाण झाली. अशा परिस्थितीतही काही भागात कपाशी पीक चांगले तर काही भागात बिकट परिस्थिती पहावयास मिळत आहे. त्यातच काही ठिकाणी कपाशीचे झाडच वाळताना दिसत आहे.
गुमगाव, कोतेवाडा, सुमठाणा, सोंडेपार शिवारात कापूस वेचणीची लगबग सुरू असून कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी चक्क १ हजार रुपये क्विंटलप्रमाणे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दुप्पट पैसे मोजावे लागत आहे.
शेतकऱ्यांचे अख्खे कुटुंब शेतात परिसरातील शिवारात कापूस वेचणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी कापूस वेचणीसाठी दररोज सकाळी गावातील विविध भागात फिरून मजूर पाहत आहे. दरम्यान, मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबालाच कापूस वेचणीसाठी शेतात जावे लागत आहे. सुटीच्या दिवशी शालेय विद्यार्थी शेतात कापूस वेचणीस आपल्या पालकांना मदत करताना दिसत आहेत.
बाहेरगावातील मजूर कापूस वेचणीला मजुराला घरून शेतात ये-जा करण्यासाठी गाडी भाडे देण्याची वेळसुद्धा शेतकऱ्यांवर आली आहे. बाहेर गावावरून जादा मजुरी देऊन मजुर आणावे लागत आहे. अशातच कापूस वेचणी झाल्यावर कापूस विकायचा की साठवून ठेवून भाववाढीची प्रतीक्षा करायची, या द्विधा अवस्थेत शेतकरी सध्या सापडला आहे. त्यामुळे शेती न परवडणारी झाली असल्याची खंत शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.