
नागपूर - युवकांचे जत्थे समोरून येत होते. जवळपास शंभर तरुण हातात रॉड, तलवार, चाकू घेऊन समोर होते. बारा जणांच्या आमच्या चमूने त्यांना मागे रेटण्यासाठी धावा केला. आम्ही त्यांना रेटण्याचा प्रयत्न करीत असताना, एकाने कुऱ्हाडीने वार केला.
तो हातावर झेलून आपल्या चमूला तेथून बाहेर काढले. तो क्षण थरारकच होता, मात्र, आम्ही सर्वच लढल्याने त्यातून बाहेर निघता आल्याची प्रतिक्रिया परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी सकाळशी बोलताना दिली.
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवीत, आरोपींची त्यांची धरपकड सुरू केली. त्यासाठी निकेतन कदम हे आपल्या बारा सहकाऱ्यांसह रात्री दहा वाजताच्या सुमारास भालदारपुऱ्यातील गल्लीतील घरांमध्ये शिरले.
यावेळी काही घरांमधून आरोपी बाहेर काढल्यावर एका ठिकाणी त्यांच्यासमोर थेट शंभरावर तरुणांचा जत्था दिसला. त्यांच्या हातात धारदार शस्त्र आणि पोलिसांच्या हातात काठ्या. मात्र, हे बाहेर आल्यास आणखी मोठा राडा होईल, यामुळे त्यांना मागे रेटण्यासाठी कदम यांच्या चमूने पुढे सरकत त्यांचा प्रतिकार केला. हा प्रतिकार करीत असताना, एकाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला.
मात्र, ती कुऱ्हाड पकडण्यासाठी कदम यांनी हात उंचावला असता, त्यांच्या हाताला दुखापत झाली. मात्र, त्यातही त्यांनी युवकांना हुसकावून लावत, आपल्या चमूसह लढा दिला आणि टीमला सुखरूप बाहेर आणले. यावेळी त्यांना झालेल्या दुखापतीमुळे तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेच त्यांच्या हातावर सर्जरी करण्यात आली.
ती परिस्थिती अंगावर शहारे आणणारी
पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर हल्ला झाला. ही बातमी त्यांच्या कुटुंबीयांना कळाली. प्रसारमाध्यमांवर ते हाताला रुमाल बांधून जात असताना बघितले तेव्हा अंगावर शहारे आले. कालची परिस्थिती आमच्यासाठी खूप पॅनिक होती. आता त्यांची प्रकृती चांगली असल्याने बरे वाटत आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांच्या मनिषा निकेतन कदम यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांकडून विचारणा
पोलिस उपायुक्त निकेतन कदम कोम्बिंग ऑपरेशन राबवीत असताना त्यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांच्या हाताला दुखापत केली. त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. आज दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्या तब्येतीची विचारणा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.