Pench Tiger Reserve : पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pench Tiger Reserve

Pench Tiger Reserve : पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी वन परिक्षेत्रामध्ये वाघाची शिकार झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांनाही वन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपासासाठी वाघाच्या अवयवाचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहे.

नागलवाडी वन परिक्षेत्राचे क्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांना वाघाची शिकार झाली असून त्याच्या शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार नागलवाडी परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या सुरेवाणी तलावाच्या संपूर्ण परिसराची झाडाझडती घेतली. दरम्यान, पथकाला वाघाचे कुजलेल्या अवस्थेतील पंजे आणि शरीराचे इतर अवशेष सापडले. याप्रकरणी सुरेवाणी गावातून तीन आरोपींना ताब्यात घेतले. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता वन कोठडी देण्यात आली आहे. वाघाचे फॉरेन्सिक नमुने गोळा करण्यात आलेले आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मदत केली.

पेंच प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक प्रभुनाथ शुक्ला, सहाय्यक वनसंरक्षक (पश्चिम पेंच) किरण पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी खापा (प्रादेशिक) सचिन आठवले, पी. एस. खंदारे आणि वन परिक्षेत्र अधिकारी सुदर्शन भट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर वाघाला जाळण्यात आले.

एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार डॉ. सुजित कोलंगट, डॉ. मयूर पावशे यांनी मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भाटकर आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी म्हणून मंदार पिंगळे, उधमसिंग यादव यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी डॉ. अमित लोहकरे, डॉ गौरव बारस्कर, डॉ सुदर्शन काकडे, डॉ पंकज थोरात, डॉ हर्षिता राघव उपस्थित होते.

टॅग्स :Nagpurtigerpench forest