Tiger Monitoring Register : पेंचमधील वाघांचा मागोवा घेतेय ‘टीएमआर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tiger Monitoring Register experiment on 44 tigers tracking tigers Pench

Tiger Monitoring Register : पेंचमधील वाघांचा मागोवा घेतेय ‘टीएमआर’

नागपूर : वाघांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी ‘रेडिओ कॉलर’चा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता कक्षानिहाय वाघ कोणत्या परिक्षेत्रात भ्रमण करीत आहेत. त्याच्या वागणूक, हालचालीचा अंदाज घेण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘टायगर मॉनिटरिंग रजिस्टर’ (टीएमआर) मध्ये नोंद केली जात आहे. त्यात वाघ कोठून आला, त्याचा भ्रमणमार्ग कोणता, त्याची वागणुकीसह इतरही माहिती या नवीन प्रयोगामुळे कळत आहे. राज्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील एक नव्हे तर ४४ वाघांवर हा प्रयोग केला जात आहे. या आधारे त्यांच्या हालचालींचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. क्षेत्रीय स्तरावर नियमित काम करणाऱ्यांकडूनच हे काम करण्याच्या सूचना क्षेत्र संचालक श्रीलक्ष्मी आणि उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. जानेवारी २०२२ पासून प्रकल्पातील ७४ कक्षांमध्ये हा प्रयोग राबविण्यात येत आहे. त्याचे फायदेही दिसत आहेत. यामुळे मानव- वन्यजीव संघर्षही कमी करण्यास मदत होऊ लागली आहे.

या प्रयोगामुळे कुठल्या क्रमांकाचा वाघ, कोणत्या क्षेत्रात भ्रमंती करीत आहे, बछडे आहे का हे कळू लागले आहे. ही माहिती अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे ती वनविभागाच्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना मिळू नये याची दक्षताही घेतली जात आहे.कक्षातील वनरक्षकच नव्हे तर वनमजूरही आता कोणता वाघ कुठे फिरत आहे हे सहज सांगू शकतात. पूर्वी पायाच्या ठशांवरून अंदाज घेता येत होता. व्याघ्र गणनेत भारतीय वन्यजीव संस्था अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली जायची. आता ट्रॅप कॅमेरामुळे वाघाच्या शरीरावरील पट्ट्यांवरून स्थानिक पातळीवरच वाघाची ओळख करता येते.

वाघांचा मागोवा घेण्यासाठी ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. त्याचा फायदा वनरक्षकापासून वनाधिकाऱ्यांना होत आहे.

- डॉ. प्रभुनाथ शुक्ल, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प