
महागाईच्या झळा, शिवभोजनाच्या थाळीत भाजीऐवजी टोमॅटो चटणी
नागपूर - गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येकच वस्तूच्या किमंतीमध्ये वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीसह भाज्यांच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचा फटका आता गरिबांच्या शिवभोजन थाळीलाही बसला असून या थाळीत भाजीऐवजी टमाटरची चटणीच वाढण्यात येत असल्याचे चित्र आहे.
गरिबांना स्वस्तात जेवण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने ठिकठिकाणी शिवभोजन थाळी देण्याचे ठरविले. त्यासाठी अनुदानही देण्यात येते. त्यानुसार अल्पदरात लाभार्थ्यांना जेवणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली. नियमानुसार २ चपाती (३०ग्रॅम), एक भाजी (१०० ग्रॅम), १ वाटी वरण (१०० ग्रॅम) आणि भात (१५०ग्रॅम) लाभार्थ्यांना देणे आवश्यक आहे. मात्र, सततच्या पावसामुळे महात्मा फुले भाजी बाजार आणि कळमना बाजारात भाज्यांची आवक ७० टक्क्यांनी कमी झालेली आहे. शनिवारी फक्त ४० गाड्यांमध्ये भाज्यांची आवक झाली. त्यामुळे सर्वच भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. अतिवृष्टीमुळे विदर्भासह राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. नाशिक, औरंगाबाद आणि परिसरातील गावातून भाज्यांची तोड करण्यासाठी मजूर मिळत नसून अनेक ठिकाणचा भाजीपाला पुरात वाहून गेला आहे. काही शेतात सततच्या पावसामुळे भाज्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे आवक विक्रमी कमी झालेली आहे.
शहरात भाज्यांच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने वांगे, फुलकोबी, कोथिंबीर, शिमला मिरची, ढेमस, कैरीचे भाव ठोक बाजारातच ५० ते ६० रुपये किलो झाले आहे. घाऊक बाजारात सर्वच भाज्यांचे भाव आता प्रतिकिलो ८० ते १२० रुपयांवर गेले आहे. त्यामुळे जेवणात भाज्या देताना शिवभोजन केंद्रांचा चांगला कस लागत आहे. याउलट सर्वात स्वस्त बाजारात टोमॅटो असल्याने त्यावरच लाभार्थ्यांची बोळवण सुरू आहे.
अनुदान आणि खर्चाचा ताळमेळ जमेना - विद्या बाहेकर
शिवभोजन केंद्रावर किमान एका दिवशी ११ ते ४ वाजतादरम्यान किमान शंभर लाभार्थ्यांना जेवण देता येते. ते करीत असताना प्रत्येक लाभार्थ्याची ऑनलाइन नोंदणी करावी लागते. त्यानुसार शासनाकडून एका व्यक्तीमागे ५० रुपये असे अनुदान मिळते. असे असले तरी दररोज भाज्या आणि जेवणासाठी लागणाऱ्या वस्तुंच्या किमती वाढल्याने लाभार्थ्यांपर्यंत ते पोहचविण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. मात्र, त्यानंतरही अनुदान आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे एका केंद्राच्या संचालिका विद्या बाहेकर यांनी सांगितले.
दररोज वांगे, कोहळे
काही केंद्रांकडून भाज्यांमध्ये कुठलेही ऑप्शन न देता, स्वस्त असलेले वांगे, दुधीभोपळा आणि कोहळ्याचाही वापर करताना दिसून येतात. मात्र, त्याही भाज्यांमध्ये गेल्या आठवड्यात वाढ झाली असल्याचे दिसून येते.
भाजीपाला ठोक भाव (रुपये/प्रतिकिलो)
वांगे -६०
फुलकोबी -८०
पानकोबी -५०
टोमॅटो -२०
कोथिंबीर - ७०
शिमला मिरची - ५०
हिरवी मिरची - ४५
पालक - ३०
भेंडी - ४०
कोहळे -२०
दुधी भोपळा -२०