कोमात प्रसूती करीत मेंदूतून काढली गाठ

आई आणि बाळ सुखरूप, अपघाताने झाला होता रक्तस्त्राव
कोमात प्रसूती करीत मेंदूतून काढली गाठ

नागपूर : नऊ महिन्याची गर्भवती माता. अपघातामुळे तिच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला आणि मेंदूत गाठ तयार झाली. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने ती कोमात गेली आणि ‘पॉलिट्रॉमा’च्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. अशा गंभीर स्थितीत डॉक्टरांनी तत्काळ कोमातील महिलेची प्रसूती केली आणि त्यानंतर मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी वेळेचे भान ठेवून घेतलेल्या निर्णयाने बाळ आणि आई या दोघांनाही जीवदान मिळाले.

मूळची भंडारा येथील २२ वर्षीय गर्भवती महिलेचा पतीसोबत डॉक्टरांकडे जात असताना अपघात झाला. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले.

परंतु , मेंदूमध्ये रक्त गोठले. पुढे त्या गर्भवतीला नागपुरातील डॉ. निर्मल जयस्वाल यांच्याकडे रेफर करण्यात आले. रुग्ण महिलेला नागपुरात आणले तेव्हा ती गंभीर अवस्थेत होती. श्वास घेण्यास अडचण होत होती. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण खाली आले आणि महिला कोमात गेली.

अशा अवस्थेत मल्टिऑर्गन निकामी होण्याच्या धोका होता. गर्भावस्थेतील अपघात, मेंदूला झालेली इजा, श्वास घेण्यास त्रास ही जोखीम स्वीकारत डॉ. जयस्वाल यांनी प्रसूत महिलेची शस्त्रक्रिया करण्यावर भर दिला. यानंतर तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून गाठ काढली.

बाळ न रडण्याचा धोका

महिलेची सुरक्षित प्रसूती झाली; परंतु बाळ रडले नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तीन मिनिटांहून अधिक काळ झाले तरी बाळ रडले नाही. यामुळे त्याच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात आले. तातडीने बालरोगतज्ज्ञांनी बाळाकडे लक्ष दिले. एकीकडे महिलेच्या मेंदूवर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली तर दुसरीकडे बाळाकडे डॉक्टरांनी लक्ष दिले. अशाप्रकारे गुंतागुंत झाल्यानंतरही अनुभवाच्या बळावर आई व बाळाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. डॉ. जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात न्युरोसर्जन डॉ. आलोक उमरेडकर, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. श्वेताली देशमुख, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भावेश बरडे, बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना जयस्वाल, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. रवी मुंदडा यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com