
नागपूर : सभागृह सुरू होताच नगरसेवकांकडून उमटलेला निषेधाचा सूर, प्रश्नोत्तराच्या तासात केटीनगर हॉस्पिटलवरून सर्वांनीच घेतलेली झाडाझडती, शेरेबाजी आणि वैयक्तिक टिकेमुळे संतापलेले आयुक्ता तुकाराम मुंढे यांनी अचानक सभागृह सोडले. आतापर्यंत विरोधकांचा सभात्याग अनुभवणाऱ्या सदस्यांनी प्रथमच आयुक्तांचा सभात्याग अनुभवला आणि महापालिकेच्या इतिहासात एका दुर्दैवी घटनेची नोंद झाली.
यानंतर दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करीत आयुक्तांना परत बोलावण्यात महापौर आणि अतिरिक्त आयुक्तही अपयशी ठरले. ज्या सभागृहात अपमान झाला तेथे परतणार नाही, असे आयुक्तांनी महापौर व अतिरिक्त आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले.
महापालिकेची सर्वसाधारण सभा रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात पार पडली. सभा सुरू होताच गेल्या तीन महिन्यातील नगरसेवकांमध्ये असलेली खदखद बाहेर पडली. प्रश्नोत्तराच्या तासापूर्वीच जेष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी आयुक्तांची कोंडी करणारा प्रश्न उपस्थित केला. तिवारी यांच्या प्रश्नाचा रोख सभागृहाबाहेर आयुक्तांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या घोषणांकडे होता.
गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेतील कारभाराबाबत अधिकाऱ्यांवर कारवाई निश्चित करून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी तिवारी यांनी महापौरांकडे केली. महापौरांच्या पत्रावर आयुक्तांनी दिलेल्या उत्तराचाही मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर प्रवीण दटके, अविनाश ठाकरे यांनीही आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला. प्रश्नोत्तराच्या तासापूर्वीच प्रशासकीय भूकंपाची पार्श्वभूमी तयार झाली.
प्रश्नोत्तराच्या तासात हरीश ग्वालवंशी यांनी केटीनगर मॉलसाठी आरक्षित जागेचे आरक्षण किंवा मॉलच्या इमारतीच्या वापर बदलण्यात आला काय? असा प्रश्न उपस्थित केला. यावर आयुक्तांनी उत्तर देण्याऐवजी नगर रचना उपसंचालक गावंडे उत्तर देण्यास आले. यावरून तिवारी यांनी आयुक्तांना टोला लगावला. प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी प्रश्नाच्या उत्तरापूर्वी लेखी उत्तर दिले असे आयुक्त सांगतात, अशी परंपरा असल्याचे सांगितले.
महापौरांनीही सभागृहाच्या नियमाचे पालन करण्याची गरज व्यक्त केली. केटीनगर मॉल ते हॉस्पिटलपर्यंतच्या प्रवासाचे एक एक पैलू उघडत गेले. यातून आयुक्तांवर सदस्यांनी ताशेरे ओढले. तिवारी यांच्यासोबत शाब्दिक चकमक रंगली तर ग्वालवंशी यांनी आयुक्तांचे नाव घेत संत तुकाराम महाराजांचे नाव कलंकित केल्याची शेरेबाजी केली. त्यामुळे आयुक्त चांगलेच संतापले आणि महापौरांना सांगून सभेतून निघून गेले.
तिवारी-आयुक्त खडाजंगी
केटीनगर मॉलवर उत्तर देण्यास आयुक्तांनी सुरूवात करताच तिवारी यांनी "पॉइंट ऑफ इन्फरमेशन'अंतर्गत माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्तांनी माझे पूर्ण झाल्यानंतर बोला, असे म्हटले. यावर तिवारी "पॉईंट ऑफ इन्फरमेशन' हा नगरसेवकांचा अधिकार असल्याचे सांगून कडाडले. यात दोघांत काही वेळ वाक्युद्ध रंगले. त्यामुळे असे होत असेल तर सभागृहात थांबणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला.
मंगळवारपर्यंत सभा स्थगित
आयुक्तांशी फोनवर चर्चा करून सभागृहात परत येण्याची विनंती केली. परंतु, ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, असे महापौरांनी सभागृहात सांगितले. आयुक्तांचे वर्तन निषेधार्थ असून सभागृह तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. मंगळवारपर्यंत सभागृह तहकूब करण्यात येत आहे. आयुक्तांनी राग बाजूला ठेऊन परत यावे, अशी सभागृहातर्फे विनंती करीत असल्याचे महापौर म्हणाले.
आयुक्त रागाने थबकले
सभागृहातून बाहेर जाण्यास आयुक्त निघाले. त्याचवेळी सभागृहातून एका नगरसेवकाने "ए रुक' असे म्हटले. त्यामुळे आयुक्त थबकले आणि त्यांनी सभागृहाकडे रागाने पाहिले. यावर महापौर म्हणाले की, आयुक्तांचा अपमान करण्याचा कुणाचाही विचार नाही. परंतु, आपण बोलत असताना कुणी बोलूच नये, असे त्यांना वाटते. ही बाबही योग्य नाही, असेही महापौरांनी सभा तहकूब करण्यापूर्वी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.