अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Seized vehicle

अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले

हिंगणा - अवैध मुरूम, गिट्टी आणि वाळू माफियांवर लगाम लावण्यासाठी कार्यवाही सुरु केली असून मगंळवारी सकाळी ११ वाजता वानाडोंगरी परिसरात तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांनी २ ब्रास रॉयल्टी असताना ४ ब्रास वाळू वाहतूक करताना ट्रक पकडला. रॉयल्टीसुद्धा हिंगणा ते अकोला मार्गाची होती. त्यामुळे ट्रकवर (एमएच ४०, बीजी ७३९६) कारवाई करून तहसील कार्यालयात नेण्यात आला. ४ ब्रास वाळूवर ३२हजार ४००रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

अवैध वाळू, गिट्टी व मुरूम उत्खनन व वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी १२ एप्रिलला सुद्धा नायब तहसीलदार महादेव दराडे, मंडळ अधिकारी राजेश चूटे, वैभव राठोड़, रमेश डंगाले, प्रवीण झीले, तलाठी अरुण गड़बैले, अमोल चव्हाण, संदीप भगत यांच्या टीमने रात्रभर रस्त्यावर उतरून शोध घेतला होता. परंतु याची माहिती वाळू माफियांना मिळाल्याने रात्रभर एकसुद्धा अवैध उत्खनन किंवा वाहतूक करणारा ट्रक दिसून आला नाही. दुसरा दिवस उजडला त्यांनी हार न पत्करता परत जाण्याचा बनाव केला. तितक्याच वेळात सकाळी ७ वाजता गुमगांव रोडवर अवैध गिट्टी वाहतूक करताना ट्रक (एमएच ४०, बीएल ६१४४) सापडला. विनारायल्टी ६ ब्रास गिट्टी होती. त्यानंतर हिंगणा रोड वाईसीसीई कॉलेजजवळ वाळू भरलेल्या ट्रकमध्ये (एम.एच. ४९ एटी ९९५९) विना रॉयल्टी ६ ब्रास वाळू पकडून ४८ हजार ६०० रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

वाळू उत्खननामुळे होतो नद्या-नाल्यांचा ऱ्हास

देवलापार - या आदिवासीबहुल भागात शेतीसाठी आधीच पाण्याची कमतरता आहे. त्यातच भर म्हणजे दररोज मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध वाळू उत्खननामुळे नद्या-नाल्यांचा ऱ्हास होत असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. अशीच परिस्थीती राहली तर शेतकऱ्यांना शेतपिकांसाठी नदी-नाल्यांतून पाणी मिळणे कठीण होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी भिती परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. देवलापार वनपरिसर क्षेत्रात अवैध वाळूचोरीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. येथून बिनधास्त वाळूची अवैध वाहतूक होत आहे. आकडेवारीत मोजल्यास दररोज वीस ते पंचेविस ट्टिप्पर भरुन मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत आहे. प्रत्येक टिप्परकडून सहा हजार रुपयांची वसुली होत आहे. असे दररोज वीस ते पंचेविस टिप्पर पैशाची तगडी रक्कम गिळंकृत करण्यात येते. याच लालसेपोटी एकाही विभागामार्फत तिळमात्र कारवाई करण्यात येत नाही.

रॉयल्टी एक, फेऱ्या अनेक

रॉयल्टी एकच असून त्यात अनेक टिप्पर भरुन वाळूची अवैध वाहतूक केली जाते. मात्र यावेळी कोणत्याही विभागाकडून कारवाई तर सोडा पण साधी चौकशी सुद्धा केली जात नाही. दरम्यान या मार्गावरून जाणारे बहुतांश वाळूचे टिप्पर हे ‘ओव्हरलोड’ असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे. वाहतूक पोलिस, आरटीओ विभागाकडून सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही, ही शोकांतिका या आदिवासीबहुल भागात पहावयास मिळते.

Web Title: Vehicle Seized From Illegal Excavators In Hingna

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top