Nagpur Cold : दहा वर्षांत यंदाचा एप्रिल महिना सर्वाधिक थंड; पारा ४२ अंशांच्या आत

एप्रिल महिन्यात कडक उन्हामुळे साधारणपणे नागपूर व विदर्भातील पारा पंचेचाळीशीपार जातो.
Temperature
Temperatureesakal

नागपूर - एप्रिल महिन्यात कडक उन्हामुळे साधारणपणे नागपूर व विदर्भातील पारा पंचेचाळीशीपार जातो. मात्र यावर्षी ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे नागपूरचे कमाल तापमान एकही दिवस ४२ अंशाच्या पार गेले नाही. तर विदर्भात चंद्रपूर येथे ४४ अंशांवर तापमान गेले होते.

गेल्या दहा वर्षांतील एप्रिल महिन्यांमध्ये तुलनात्मकदृष्‍ट्या यंदाच्या एप्रिल महिन्याची सर्वाधिक थंड महिना म्हणून नोंद झाली आहे. बदलते निसर्गचक्र व ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा हा दुष्परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मे नंतर एप्रिल हा विदर्भातील सर्वात तापदायक महिना गणला जातो. यंदा ‘एल निनो’चा प्रभाव असल्याने हा महिना चांगला तापणार, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र वरुणराजाने नियमितपणे हजेरी लावत ‘एल निनो’लाही प्रभावहीन केले. दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता जवळपास संपूर्ण महिन्यातच पाऊस व ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या एप्रिलमध्ये उन्हाचे चटके कमी बसले.

तज्ज्ञ काय सांगतात?

या विचित्र स्थितीबद्दल चंद्रपूरचे हवामानतज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे म्हणाले, विदर्भातील उन्हाची लाट मुख्यत्वे राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांवर अवलंबून असते. कोरडे वातावरण असेल तरच उष्णलाट येऊन तापमानात वाढ होते. दुर्दैवाने या महिन्यात ते चित्र दिसले नाही. कधी ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ तर कधी ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’मुळे अवकाळी पावसाने विदर्भात अधूनमधून नियमित हजेरी लावून त्यात बाधा आणली.

परिणामतः राजस्थानकडून विदर्भाच्या दिशेने फारशा उष्ण लाटा आल्या नाहीत. उन्हाची तीव्रता कमी होण्याचे हे मुख्य कारण ठरले. बदलते निसर्गचक्र, ‘ग्लोबल वॉर्मिंग’ व वाढत्या प्रदुषणामुळेही वातावरणावर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

महिनाभर उकाड्यापासून दिलासा

महिनाभरातील तापमानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, नागपूरचे कमाल तापमान एकच दिवस (३० एप्रिलला) ४१.४ अंशांवर गेले होते. तर १९ एप्रिलला अकोल्याचा पारा ४४ अंशांवर गेला होता. वाशीम व चंद्रपूर येथेही महिन्यातील सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. उर्वरित दिवस तापमान ३५ ते ४२ च्या दरम्यान राहिले. त्यामुळे भर उन्हाळ्यातही वैदर्भियांना ऊन व उकाड्यापासून दिलासा मिळाला.

विदर्भात एप्रिलपाठोपाठ मे महिन्यात सर्वाधिक ऊन असते. मात्र यावर्षी एप्रिलमध्ये फारसे ऊन तापलेच नाही. मात्र याचा आगामी मॉन्सूनवर कसलाही परिणाम होणार नाही. कारण मे महिन्यात कडक ऊन तापण्याची दाट शक्यता आहे.

- प्रा. सुरेश चोपणे, हवामानतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com