राज ठाकरे यांची टीम आज नागपूरमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray MNS leaders team in Nagpur today

राज ठाकरे यांची टीम आज नागपूरमध्ये

नागपूर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याची आखणी करण्यासाठी त्यांची खास टीम बुधवारी (ता. १४) नागपुरात दाखल होत आहे. राज ठाकरे मुंबईवरून विदर्भ एक्सप्रेसने सकाळी १८ तारखेला शहरात दाखल होणार असून विदर्भात त्यांचा आठवडाभर मुक्काम राहणार आहे.

राज ठाकरे यांच्या खास चमूतील अविनाश जाधव, संदीप देशपांडे आणि आनंद एंबडवार हे तीन प्रमुख नेते रविभवन येथे राज ठाकरे यांच्या बैठका, पदाधिकाऱ्यांची निवड, विदर्भातील राजकीय परिस्थिती जाणून घेणार आहेत. नागपूरसह अमरावती, अकोला, चंद्रपूर महापालिकेच्या आगामी निवडणुका तसेच पक्षाची पुनर्बांधणी यासाठी राज येत आहेत. या दौऱ्यात संघटनेतही मोठे फेरबदल करण्याचे संकेत देण्यात आले असल्याने अनेक वर्षांपासून मोठमोठ्‍या पदांवर ठाण मांडून बसलेल्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मनसेची स्थापना झाली तेव्हा विदर्भातील कार्यकर्त्यांना मोठे आकर्षण होते.

शिवसेनेला पर्याय लाभल्याने अनेकांनी मनसेत प्रवेशही केला होता. नागपूर महापालिकेत पहिल्याच निवडणुकीत मनसेने खातेही उघडले होते. त्यांचे दोन नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला ओहोटी लागली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले. अनेकजण पुन्हा शिवसेनेत परतले. त्यामुळे मनसे विदर्भातून जवळपास संपुष्टात आली आहे.

आता राज्यात राजकीय परिस्थितीने मोठी कलाटणी घेतली आहे. शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाल्याने ४० आमदारांनी बंड पुकारून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यातही जवळीक निर्माण झाली आहे. भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

भाजप-शिंदेसेना-मनसे युतीची शक्यता

मुंबईसह सर्वच प्रमुख शहरांमध्ये शिवसेनेला पर्याय उभा करण्यासाठी मनसे नव्याने उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपसोबत मनसे आणि शिंदेसेना अशी युती होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचा धनुष्यबाण नाकारल्यास शिंदेसेना यांनाही कुणाचा तरी आधार लागणार आहे. मुंबईमध्ये ठाकरे घराण्याचे वलय लक्षात घेता मनसे हाच त्यांच्यासाठी सर्वोत्तम व फायदेशीर पर्याय असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Web Title: Vidarbha Raj Thackeray Mns Leaders Team In Nagpur Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..