
‘ला निना’ मुळे यंदा विदर्भात दमदार पाऊस
नागपूर : भारतीय हवामान विभागाने यंदा संपूर्ण देशात सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी, यासाठी मुळात ''ला निना इफेक्ट्स'' कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. ‘ला निना’ मुळेच यावर्षी विदर्भातही दमदार पाऊस बरसणार असल्याची माहिती, प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांनी दिली.
साहू म्हणाले, हवामान विभागाने नुकतेच पहिल्या चरणातील पावसाचे भाकित वर्तविले आहे. त्यानुसार, यावर्षी देशभरात मॉन्सून दणक्यात बरसणार असून, सरासरीच्या ९९ टक्के पावसाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुळात मॉन्सूनचा पाऊस जागतिक पातळीवरील ‘एल निनो’ किंवा ‘ला निना’ या दोन गोष्टींवर अवलंबून असतो. गतवर्षी ‘एल निनो’च्या प्रभावामुळे संपूर्ण देशात अनियमित पाऊस पडला. कुठे सरासरीच्या अधिक पाऊस बरसला, तर काही ठिकाणी पावसाने सरासरीही गाठली नाही. सुदैवाने यंदा तशी स्थिती उद्भवण्याची शक्यता खूप कमी आहे. यावर्षी मॉन्सूनवर ‘ला निना’चा इफेक्ट्स असल्याने सगळीकडेच दमदार पाऊस अपेक्षित आहे.
‘ला निना’ संदर्भात सविस्तर माहिती देताना साहू म्हणाले, यावर्षी पॅसिफिक महासागरात ‘ला निना’ची स्थिती राहणार आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरूच्या समुद्र किनाऱ्यावर तापमान जितके कमी, तितका मॉन्सून अधिक मजबूत असतो. यावर्षी त्या ठिकाणी तापमान सरासरीच्या कमी राहण्याची शक्यता असल्याने, साहजिकच त्याचा मॉन्सूनवर सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे देशासह विदर्भातही यंदा दमदार पाऊस पडणार आहे. याउलट पॅसिफिक महासागरात तापमान अधिक राहिल्यास ‘एल निनो’ची स्थिती उद्भवून त्याचा मॉन्सूनवर विपरित परिणाम होतो. शेवटी मॉन्सून ही एकप्रकारे हवाच असते. वारे जेवढे मजबूत राहतील, तेवढा अधिक पाऊस पडतो. त्यात अडथळे येत राहिल्यास मॉन्सून कमकुवत बनून, पावसावर विपरित परिणाम होतो. दक्षिण-पश्चिम मॉन्सून यंदा सहा दिवस आधी अंदमानमध्ये दाखल झाल्याने विदर्भातही निर्धारित तारखेपूर्वीच आगमन होण्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तविली. वैदर्भीय शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे.
‘एल निनो’ व ‘ला निना’ मधील फरक
स्पॅनिश भाषेत ‘एल निनो’ म्हणजे लहान मुलगा (द लिटल बॉय) आणि ‘ला निना’ म्हणजे लहान मुलगी (द लिटल गर्ल). ते भाऊ आणि बहिणीसारखे आहेत. बऱ्याच भावंडांप्रमाणे, दोन हवामानपद्धती एकदुसऱ्याच्या विरुद्ध आहेत. ‘ला निना''मुळे पॅसिफिकमधील पाणी नेहमीपेक्षा थंड होते. त्याच प्रदेशात ‘एल निनो’मुळे पाणी नेहमीपेक्षा अधिक गरम असते. ज्यावेळी ‘ला निना’चा प्रभाव असतो, त्यावर्षी भरपूर पाऊस पडतो. याउलट ‘एल निनो’ वर्षात दुष्काळसदृश स्थिती असते. साधारणपणे ‘ला निना’ वर्ष ‘एल निनो’नंतर एक किंवा दोन वर्षांनी येते.