Nagpur : विधानभवनाची अग्निसुरक्षा यंत्रणा नापास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire audit

विधानभवनाची अग्निसुरक्षा यंत्रणा नापास!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हिवाळी अधिवेशनाबद्दल अद्यापही अनिश्चितता असली तरी प्रशासन मात्र, तयारीला लागले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील सरकारी व निमसरकारी कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी केली. या तपासणीत राजभवन, विधानभवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस या अतिमहत्त्वाच्या इमारतीसह प्रमुख इमारती व कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा बंद स्थितीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

सरकारी विश्रामगृहातही यंत्रणा बंदच

अधिवेशन काळात महत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असलेल्या विश्रामगृहातही अग्निशमन यंत्रणा कार्यरत नाही. त्यांनाही नोटीस बजावली आहे. अधिवेशन आले की कार्यालये व विश्रामगृहातील यंत्रणेची तपासणी केली जाते. जीवन विमा निगम कार्यालय, सिव्हिल लाईन परिसरातील प्रशासकीय इमारती, जलसंपदा विभागाचे कार्यालय अशा महत्त्वाच्या कार्यालयात अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे.

भंडारापाठोपाठ अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर सरकारी कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सरकारी यंत्रणाअद्यापही याबद्दल गंभीर नसल्याचे दिसून येते. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने राजभवन, विधान भवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस, आमदार निवास यासह शहरातील २८ सरकारी इमारती व विश्रामगृहातील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी केली. कुठे ही यंत्रणा नाही, तर कुठे यंत्रणा आहे, पण ती कार्यरत नसल्याचे उघडकीस आले आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत नसलेल्या कार्यालयांना अग्निशमन विभागाच्या अधिनियमातील कलम ६ नुसार नोटीस बजावली आहे. नोटीस बजावल्यानंतरही सुरक्षा यंत्रणा कार्यरत न केल्यास संबंधित कार्यालयांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा अग्निशमन विभागाने दिला आहे.

धोका असलेल्या अतिमहत्वाच्या इमारती

  1. हैदराबाद हाऊस : सुयोग बिल्डिंग ;आमदार निवास

  2. १६० खोल्यांचे गाळे : वनामती (रामदासपेठ)

  3. सेमिनरी हिल्स येथील सी.पी.डब्ल्यू. विश्रामगृह

  4. डब्ल्यूसीएल विश्रामगृह, सिव्हिल लाईन

  5. डब्ल्यूसीएल विश्रामगृह, कल्पनानगर ;रेल्वे क्लब विश्रामगृह

  6. रेल्वे सातपुडा विश्रामगृह ; एम.ई.सी.एल. विश्रामगृह

  7. एनपीटीआय विश्रामगृह ; राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर विश्रामगृह

  8. वन विभाग विश्रामगृह ; ऑटोमिक एनर्जी विश्रामगृह

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या सरकारी इमारतीतील अग्निरोधक यंत्राची गेल्या महिन्यात तपासणी करण्यात आली. त्याकाळात काही त्रुट्या आढळून आल्या आहेत. त्या दुरुस्त व उपाययोजना करण्यासंदर्भात बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत.

-राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा, नागपूर.

loading image
go to top