
वॉर्डबॉयनेच चोरले रेमडेसिव्हीर इंजेक्शन, कारागृहात रवानगी
नागपूर : कामठी रोडवरील होप हॉस्पिटलमधील रेमडेसिव्हिर इंजेक्शनची चोरी करून त्याची काळाबाजारात विक्री करणाऱ्या वॉर्डबॉयला पोलिसांनी रंगेहात अटक केली. आरिफ शेख रफीक शेख (वय २२, रा. शांतीनगर), असे अटकेतील वॉर्डबॉयचे नाव आहे.
हेही वाचा: कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले लाखनीचे युवक; ऑक्सिजन सिलिंडरची केली व्यवस्था
पोलिसांच्या माहितीनुसार, होप हॉस्पिटल येथील औषध व्यवस्थापनाचे काम अंकित अशोक केसरी (वय २७, रा. रनाळा) याच्याकडे आहे. गत एक वर्षापासून आरिफ हा हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय आहे. शुक्रवारी तो रात्रपाळीला हॉस्पिटलमध्ये आला. शनिवारी सकाळी त्याने हॉस्पिटलमधील फ्रीजमधून दोन रेमडेसिव्हिर चोरी केले. दरम्यान, अंकित याने फ्रीजची पाहणी केली. त्याला दोन रेमडेसिव्हिर कमी दिसल्या. आरिफ हा संशयास्पद स्थितीत फिरताना दिसला. अंकित याने डॉक्टरला सांगितले. आरिफची तपासणी केली असता त्याच्याकडे दोन रेमडेसिव्हिर आढळल्या. हॉस्पिटल प्रशासने पाचपावली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नगराळे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी आरिफ याला अटक केली. न्यायालयाने आरिफ याची कारागृहात रवानगी केली. आरिफ याने चार ते पाच वेळा हॉस्पिटलमधून रेमडेसिव्हिर चोरी केल्याची माहिती आहे.
एमआरसह दोघांना दोन दिवस पीसीआर -
रेमडेसिव्हिर विकण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रतिनिधीसह (एमआर) दोघांची न्यायालयाने दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली. मनीष जोशी व गोपाल शर्मा, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मनीष हा एमआर असून, गोपाल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्यांचा गोलू नावाचा साथीदार फरार आहे. सदर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Web Title: Wardboy Stolen Remdesivir Injection In Hope Hospital
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..