
नागपूर : पत्नीने हातोड्याचे सपासप घाव घालत व्यसनी आणि परस्त्रीवर पैशांची उधळण करणाऱ्या रंगेल पतीचा मुडदा पाडला. स्त्रीमुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळी जयवंतनगरात ही थरारक घटना घडली. पत्नीने स्वत: अजनी ठाण्यात आत्मसमर्पण करीत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तिला अटक केली आहे.
महेश पोरंडवार (44) असे मृताचे, तर ममता पोरंडवार (41) असे अटकेतील महिलेचे नाव आहे. महेश सधन घरचा असून, भगवाननगरात स्वत:चे घर आहे. त्यांना मुलगा व एक विवाहित मुलगी आहे. प्राप्त माहितीनुसार, आधी महेशकडे कार, ट्रक आणि छोटे मालवाहू वाहन होते. मालवाहतुकीच्या क्षेत्रात असल्याने मुबलक कमाईसुद्धा होती. त्यातूनच त्याला दारूचे व्यसन जडले.
कालांतराने व्यसन अधिकच वाढले. त्यासाठी पैशांची उधळण सुरू होती. त्याचे बाहेर अनैतिक संबंधसुद्धा असावेत, म्हणूनच अमाप पैसा खर्च करीत असल्याची शंका पत्नीला होती. त्यामुळे पती-पत्नीत नेहमी खटके उडू लागले. यातून महेश अजनी हद्दीतील जयवंतनगरात अथर्व आटाचक्कीजवळ खोली घेऊन वेगळा राहू लागला.
एक-एक करीत कार, ट्रक, मालवाहू वाहनाचीही महेशने विक्री केली होती. शिवाय, व्यसनासाठी घरातील साहित्याचीही विक्री करणे सुरू केले होते. ममताला माहेरून काही संपत्ती मिळाली होती. त्यावरही महेशचा डोळा असल्याचे कळते.
मुलाच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याने उधळपट्टीला आळा घाला, अशी समजूत नेहमीच ममता काढत होती. परंतु, त्याचा काहीच परिणाम महेशवर होत नव्हता. नेहमीच मुलाच्या भवितव्याचा प्रश्न तिला सतावत होता.
मुलाला पैशांची गरज असल्याने गुरुवारी सायंकाळी महेशच्या खोलीवर जाऊन ममताने पैशांची मागणी केली. दारूच्या नशेत असलेल्या महेशने पैसे देण्यास नकार दिला. शिवीगाळही केली. यामुळे ममता कमालीची संतापली. घरातीलच लोखंडी हातोडा घेत त्याच्या डोक्यावर सपासप घाव घातले. डोक्याचा चेंदामेंदा झाल्यावरही त्याची हालचाल पूर्णपणे थांबेपर्यंत ती घाव घालतच होती. यामुळे संपूर्ण खोलीच रक्ताने माखली होती. घटनेनंतर ममताने स्वत: अजनी ठाण्यात जाऊन माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.