
भरघोस मताधिक्याने निवडून आलेल्या महायुतीचे पहिले अधिवेशन नागपुरात नुकतेच पार पडले. विदर्भातील प्रश्नांवर चर्चा होऊन ते तडीस नेले जातील, या उद्देशाने नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन घेतले जाते. अधिवेशनादरम्यान भरपूर राजकारण झाले. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून नाराजीनाट्य रंगले. परंतु, विदर्भाला या अधिवेशनाने काय दिले याची गोळाबेरीज तज्ज्ञांच्या शून्यच राहिली. विदर्भाच्या प्रश्नांवर केवळ चर्चा नव्हे तर कृतीची जोड देणे तेवढेच आवश्यक असताना धानाचा बोनस २५ हजारांवरून २० हजारांवर आला. एसटीकडे दुर्लक्ष झाले. शिक्षणाची पाटी कोरीच राहिली. यामुळे विदर्भाच्या हाती धत्तुरा मिळाला, असेच म्हणावे लागेल.