esakal | Nagpur : हिवाळी अधिवेशन नागपुरात?
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur : हिवाळी अधिवेशन नागपुरात?

Nagpur : हिवाळी अधिवेशन नागपुरात?

sakal_logo
By
नीलेश डोये -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरला होण्याची शक्यता आहे. प्रशासनात तशी चर्चा असून त्यादृष्टिने हालचाली सुरू झाल्या आहेत. नागपूर करारानुसार राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. परंतु, कोरोनामुळे मागील वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला झाले नव्हते. याआधी चार ते पाच वेळा एकही अधिवेशन नागपूरला झाले नसल्याचे सांगण्यात येते.

हिवाळी अधिवेशन न झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, कोरोनाचे कारण ते नाकारण्यात आले. त्यानंतरचे पावसाळी अधिवेशनही मुंबईतच झाले. तीनही अधिवेशनांचा कालावधी जास्त नव्हता. आठवडाभरही अधिवेशन चालले नाही. त्यामुळे तारांकित प्रश्न, औचित्याचे मुद्यांसह विधिमंडळाचे अन्य कामकाज झाले नाही. सदस्यांना आपल्या भागातील प्रश्न, मुद्दे मांडता आले नसल्याने त्यांच्यात नाराजी होती. सरकारने आपल्या सोयीचे विषय मार्गी लावल्याची टीका करण्यात आली. आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्व पदावर येत आहे. कोरोना बाधितांची संख्याही कमी आहे. शाळा सुरू करण्यात आल्या असून धार्मिक स्थळ सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ४ ऑक्टोबरपासून शाळा तर ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळ भक्तांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनिक स्तरावर मिळत आहेत.

त्यादृष्टिने कामाला लागण्याच्या अप्रत्यक्ष सूचना मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत. अधिवेशनाचा कालावधी ८ ते १० दिवसांचा राहणार असल्याची चर्चा आहे. प्रशासनही त्या दिशेने तयारीला लागले आहे. अधिकाऱ्यांकडून लायझनिंग अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांची यादीही तयार करण्यात येत आहे. ठरल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात संपूर्ण सरकार व मंत्रालय नागपुरात डेरेदाखल होईल. परंतु, त्यात बदल झाल्यास नोव्हेंबर अखेर सुद्धा होण्याची चर्चा आहे. ऑक्टोबरच्या १५ तारखेनंतर चित्र जवळपास चित्र होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

बांधकाम विभाग तयारीला

अधिवेशनात बांधकाम विभागाची जबाबदारी अधिक असते. उपमुख्यमंत्री यांचे निवास देवगिरी, रविभवन, नागभवन, १६० गाळे, आमदार निवास, विधानभवन सुसज्ज करावे लागते. आमदार निवासमधील एका इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. हे सेंटर हलविण्याचे पत्र बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे.

loading image
go to top