
कर्नाटक सीमाप्रश्नावर विधानपरिषदेत झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान शासनाची भूमिका आणि योजनांची माहिती त्यांनी दिली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
Winter Session : सीमावासीयांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र विभाग - एकनाथ शिंदे
नागपूर - ‘कर्नाटक भागातील मराठी सीमावासीयांसाठी एकमताने ठराव मांडण्यात आला आहे. केवळ सहा महिन्यांमध्ये सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे राज्य सरकारने उचललेल्या या पावलातून दाखवून दिले आहे. कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.
कर्नाटक सीमाप्रश्नावर विधानपरिषदेत झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान शासनाची भूमिका आणि योजनांची माहिती त्यांनी दिली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की कर्नाटक सरकारने मराठी सीमावासीयांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्यावर दाखल प्रकरणांविरोधात लढण्यासाठी राज्य शासनाकडून वकिलांची फौज उभी करणार आहे.
मराठी बांधवांनी आपले वकील नेमले असल्यास त्याचे शुल्क राज्य शासन देईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. सोबतच, मुख्यमंत्री सहायता निधी या योजनेमध्ये सीमाभागातील सर्व ८६५ गावांतील मराठी रहिवाशांचा समावेश करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कर्नाटक भागात घडलेली प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात मांडू, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंना टोला
विरोधी पक्षावर निशाणा साधत ते म्हणाले, की कर्नाटक प्रश्नावर प्रत्येक पक्षाच्या सरकारने आपापल्या परीने संघर्ष केला आहे. आंदोलनात आम्हीही लाठ्या-काठ्या खाल्या आहेत. काहींना तुरुंगवाससुद्धा भोगावा लागला आहे. आम्ही सहा महिन्यात हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा विरोधकांची असेल तर विरोधकांच्या या विश्वासावर आम्हाला अभिमान आहे. आमच्या क्षमतेवर त्यांनी विश्वास दाखविला आहे. मी एक शिवसैनिक आहे, मुख्यमंत्री नाही. आमच्या कार्यक्षमतेमुळे घराबाहेर न पडणारे आज बाहेर पडले, विधानभवनाच्या पायरीवर बसले, यातच आमचा विजय असल्याचे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
‘त्या’ आमदारांना अटक होणार नाही
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणात आमदारांवर गुन्हे दाखल केले. याची मी दखल घेतली असून यासंबंधातील कलमांचा कुठलाही दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेईन. या आमदारांना अटक होणार नाही, अशा सूचना मी देईन, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिले. आमदार अनिल परब यांनी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल केल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत मांडला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. अनिल परब म्हणाले, की विरोधी पक्ष नेत्यांकडे उद्धव ठाकरे यांनी बैठक आयोजित केली होती. त्याकरिता नितीन देशमुख जात असताना त्यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी अडविले आणि पासची मागणी केली. नितीन देशमुख यांनी बॅच दाखविला असता असे बॅच कोणीही छापू शकते असे उत्तर त्या कर्मचाऱ्याने देशमुखांना दिले. त्यातून वाद सुरू झाल्याचे मत आमदार परब यांनी मांडले.