

नागपूर : ‘औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाज़ार दिया, जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा दुत्कार दिया...’ या साहिर लुधियानवी यांच्या नुसत्याच कवितेच्या ओळी नाहीत, तर बदनाम वस्तीमधील महिलांच्या यातनांची यात्रा नजरेसमोर उभी राहते. लुधियानवी यांच्या ओळी गंगा जमुनात (ganga jamuna nagpur) शरीर विकून पोट भरणाऱ्या संजना (बदललेलं नाव)च्या आयुष्याशी तंतोतंत जुळतात. गाण्यातून मांडलेलं विदारक वास्तव दररोज संजना जगत आहे.
लग्नानंतर अर्ध्यावरच या माउलीचा संसार मोडला असताना गंगा जमुना मदतीला धावून आली. या महिलांच्या घरी धुणीभांडी करू लागली. एका काळोख्या रात्री कोणीतरी दारूच्या नशेत तिच्या अब्रूवर घाव घातला आणि नियतीने दिलेला गर्भ पोटात वाढू लागला. नऊ महिन्यानंतर मांडीवर आली अनौरस निशाणी. आज अनौरस बाळ छातीशी कवटाळून ती जगत आहे. ग्राहकांसोबत असताना दोन वर्षांच्या चिमुकल्या कुशीतून दूर करताना होणाऱ्या यातनांचा हिशोब मांडता येत नाही. देहाचे लचके तुटल्यानंतर थकलेल्या मनाने ती आपल्या आकाशला छातीशी कवटाळते, त्यावेळी त्या मातेचे डोळे पाणावतात.
संजनाचा जन्म याच वस्तीतील. जन्मानंतर आई वडिलांचे छत्र हरवले. आजीने लग्न करून दिलं. पैसा नव्हता, त्यावेळी गंगा जमुनातील देह विकणाऱ्या महिलांनी वर्गणी गोळा करून भवानी मंदिरात थाटात लग्न करून दिले. पारडी परिसरात शंकरसोबत गोड संसार सुरू झाला. मात्र, दुसऱ्याच वर्षी शंकरचा असाध्य आजाराने मृत्यू झाला. त्यातच आजी गेली. पुन्हा एकदा संजना अनाथ झाली. जगण्याची पंचाईत झाली, त्यावेळी मदतीला गंगा जमुनातील महिला धावून आल्या. येथील अनेक महिलांच्या घरी धुणीभांडी करून पोट भरण्याचं साधन मिळालं. वस्तीच्या बाजूला भाड्याचं घर घेऊन राहू लागली. मात्र, नियतीचं सांगता येत नाही. जो दुःखी असतो, त्याच्याच नशीबी दुःखाचा डोंगर असतो. तेच संजनाच्या बाबतीत घडलं. एक दिवस कोण्या नराधमाने पेयातून दारू दिली आणि घात केला. तेथूनच नशिबाचे फेरे बदलले अन् देह विकण्याचा व्यवसाय नशिबी आला. अप्रतिष्ठित असा व्यवसाय करत असली तरी महिला म्हणून ती ताठ मान करून आपले मत मांडते.
नको होता मातृत्वाचा आनंद -
दारूच्या नशेत मिळालेल्या या मातृत्वाचा संजनाला तिरस्कार वाटत होता. गर्भपात करण्यासाठी संजना डागा पासून तर मेयोत खेटा घालत होती. मात्र, घरगुती महिला अशी नोंद वैद्यकीय कार्डावर असल्याने नवऱ्याचे नाव सांगा, असे विचारताच अभागी गर्भवती संजनाच्या तोंडाला कुलूप लागत होते. अखेर बाळ जन्माला आले. या अनौरस बाळाच्या जन्माचा आनंद मात्र संजनाला झाला नाही. हे बाळ संजनाला नको असल्याची वार्ता कानोकानी पसरली. त्यावेळी दत्तक घेण्याशी शंभरावर व्यक्तींनी संपर्क साधला होता. आज मात्र पाच मिनिट आकाश दूर झाला की, ही माय कासावीस होते. येत्या १६ सप्टेंबरला आकाशच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
हेमलता मॅडमची मोलाची मदत -
ना जाणे ती कुठून आली. ती कुठली आहे. कोणाशी तिचे रक्ताचे नाते नाही. मात्र, मेयो रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली असताना तिच्याजवळ कवडी नव्हती. त्यावेळी बदनाम वस्तीतील वारांगनांनी मदत केली. सर्वाधिक मदत रेडक्रॉस सोसायटीच्या हेमलता लोहवे यांनी केली. संजनाच्या बाळाला कपड्यांपासून, तर आता खेळणी आणि खाऊ पुरवण्याचे काम हेमलता आणि मंगला कडवे करीत आहेत. संजनाची ही दुःखाने माखलेली कहाणी खुद्द तीने मांडण्याचं धैर्य संजनाने दाखवलं. पोलिसांच्या दहशतीमुळे गंगा जमना उद्ध्वस्त होत असल्याने ती प्रचंड अस्वस्थ आहे. ओठांची थरथर होत असली तरी गंगा जमुना ही वस्ती येथेच राहावी अशी भावना ती व्यक्त करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.