
नागपूर : दारू दुकानामुळे महिला, विद्यार्थी त्रस्त
वाडी(प्र) - दवलामेटी परिसरातील वसाहतीत व वर्दळीच्या ठिकाणी असलेले देशी दारूचे दुकान अन्यत्र स्थलांतरित करावे यासाठी शुक्रवारी निवासी जिल्हाधिकारी विजया बनकर व अन्य विभागाला निवेदन देण्यात आले. यावर दवलामेटी येथील दारुभट्टी हटाव समिती, वंचित बहुजन आघाडी, बुधघोष महाविहार आणि मानवाधिकार आयोग नागपूर जिल्हा यांनी संयुक्तपणे कार्यवाहीची मागणी केली. अन्यथा जनांदोलनही उभारण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास वाटकर, दारुभट्टी हटाव समितीच्या अध्यक्ष माधुरी खोब्रागडे,सचिव विद्या गणवीर,कोषाध्यक्ष जोत्सना बेले, मानवाधिकार आयोग नागपूरचे राहूल पाटील आदी उपस्थित होते. दारू दुकानाला दवलामेटी ग्रामपंचायतची एनओसी नाही, १९७५ या काळात अन्य ग्रा.प ची एनओसी घेऊन या ठिकाणी हे दुकान सुरू करण्यात आले. तेंव्हा या ठिकाणी तुरळक लोकवस्ती होती. आता परिस्थिती बदलली आहे.हे दारू दुकान वसाहतीत आले आहे. जवळच इन्फ्रंट शाळा, सरोजनी पब्लिक स्कूल, दृगधामना हायस्कूल, चर्च, बौद्ध विहार, रुग्णालय, आठवडी बाजार व लोकवस्ती आहे. यामुळे महिला,युवक,विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दारू भट्टी येथून अन्यत्र स्थलांतरित करावी अशी मागणी आहे.
याकडे विविध संघटनांनी निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याबाबत ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर योग्य कार्यवाही करावी. दारू भट्टन हटवल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असे नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विलास वाटकर यांनी सांगितले. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे नागपूर शहर अध्यक्ष रवी शेंडे, प्रवक्ता सुमित गोंडाणे, दारु भट्टी हटाव समितीच्या अध्यक्ष माधुरी खोब्रागडे, सचिव विद्या गणवीर, कोषाध्यक्ष जोत्सना बेले, लोखंडे , नारनवरे, प्रीती वाकडे, महानंदा राऊत, लता म्हैस्कर,साधना नितनवरे, रूपाली गिरी, सुनिता बोरकर, वर्षा जांभुळे, दीपक कोरे, अंनवर अली, रोहित राऊत, दर्शन बेले , राहुल पाटील व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.