
परतवाडा : अचलपूर येथील फिनले मिल सुरू करावी व थकीत वेतन द्यावे, या मागणीसाठी कामगारांनी आज (ता. २७) मिलच्या चिमणीवर चढून शोले स्टाइल आंदोलन सुरू केले आहे.अचलपूर शहरात एकमेव मोठा उद्योग असलेला फिनले मिल कोरोनापासून बंद आहे. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून काही कामगारांना मिळेल ते काम करावे लागत असल्याचे वास्तव चित्र आहे. मिल सुरू करावी, यासाठी वेळोवेळी कामगारांनी आंदोलने केली. आमदार-खासदार व विविध मंत्र्यांनाही निवेदने दिली. मात्र कामगारांच्या पदरी आश्वासनांच्या पलीकडे अद्याप तरी काही आले नाही.