esakal | १५ टक्के कर्मचाऱ्यांमुळे विद्यापीठावर वाढला कामाचा बोजा; परीक्षेसह इतर कामे खोळंबली

बोलून बातमी शोधा

null

१५ टक्के कर्मचाऱ्यांमुळे विद्यापीठावर वाढला कामाचा बोजा; परीक्षेसह इतर कामे खोळंबली

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : कोरोनामुळे राज्यात टाळेबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच शासकीय संस्थांमध्ये १५ टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर कामाचा बोजा वाढला आहे.

हेही वाचा: महानिर्मितीचं मिशन ऑक्सिजन; कोराडी वीजकेंद्रातून होणार दररोज १ हजार सिलिंडर्सचा पुरवठा

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने टाळेबंदी अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयात केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांना काम करण्याचे निर्देश काढले. त्यामुळे आता सर्व शासकीय कार्यालयात केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांसह कामकाज सुरू आहे. शहरात कोरोनाचे गेल्या पंधरा दिवसांत रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे बऱ्याच कार्यालयातील कर्मचारी कोरोनाने संक्रमित झालेले आहेत. त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातीलही कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

सध्या विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सुरू असून मे महिन्याच्या शेवटी उन्हाळी परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे या परीक्षांचे नियोजन आणि त्यांची अंमलबजावणी करायची आहे. याशिवाय विद्यापीठातील वित्त विभाग आणि इतर विभागातही जवळपास अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात कामे शिल्लक असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आपल्या शिष्यवृत्तीची विचारणा करण्यास गेले असताना, त्यांनी विद्यापीठात १५ टक्केच कर्मचारी कामात असल्याने एका महिन्यात शिष्यवृत्ती मिळेल, असे सांगण्यात आले. जवळपास हीच परिस्थिती सर्व विभागात आहे. त्यामुळे अनेक प्रस्ताव व कामे रेंगाळली असल्याचे दिसून येत आहे.

पदभरतीचा मोठा अनुशेष

विद्यापीठामध्ये ९४१ मंजूर पदांपैकी ३७३ पदे रिक्त आहेत. त्यात प्राध्यापकांची एकूण ४६५ मंजूर पदे आहेत. त्यापैकी केवळ २४३ पदे भरण्यात आली आहेत. अद्यापही २२२ पदे रिक्त आहेत. यात सहायक प्राध्यापकांची सर्वांत जास्त ६८ तर सहयोगी प्राध्यापकांची ४६ पदे रिक्त आहेत. याशिवाय इतर प्राध्यापकांचा समावेश आहे. यानंतर तृतीय श्रेणीत रिक्त पदांचे प्रमाण १५१ एवढे आहे.

हेही वाचा: नागपूरकरांनो, बाधितांची संख्या घटतेय; ७२ तासांत तब्बल २१ हजार २४५ रुग्णांची कोरोनावर मात

विद्यापीठात तृतीय श्रेणीची ४७६ मंजूर पदे आहेत. यापैकी ३२५ पदे भरली असून १५१ पदे रिक्त आहेत. त्याची टक्केवारी ३१ एवढी आहे. रिक्त पदांमध्ये निम्न श्रेणी लिपिकांची ६४, उच्च श्रेणी लिपिकांची १५ तर निवड श्रेणी लिपिकांची १५ पदे आहेत. यामध्ये विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संचालित महाविद्यालयात शिक्षकांची ४७ टक्के पदे रिक्त आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ