आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू विकतोय चहा व पोहे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

International Archery sport Players Sandeep Gawai sale Tea and Pohe

आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू विकतोय चहा व पोहे

नागपूर : आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदक मिळवून दिल्यानंतर दिव्यांग तिरंदाज संदीप गवईने नोकरीसाठी आठ ते दहा वर्षे शासनदरबारी उंबरठे झिजविले. ‘सीएम’पासून ‘डीएसओ’पर्यंत अनेकांना अर्ज व विनंत्या केल्या. मात्र त्याउपरही नोकरी न मिळाल्याने अखेर निराश होऊन संदीपने पोटापाण्यासाठी फूटपाथवर चहाची छोटीसी टपरी टाकली. राज्य व देशाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या एका पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडूची शासनाने अशाप्रकारे उपेक्षा केल्याबद्दल क्रीडा विश्वात दुःख व आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तिरंदाज व पॉवरलिफ्टर असे दोन खेळ खेळणाऱ्या ४४ वर्षीय संदीपने उमेदीच्या काळात थायलंड, इटली व झेक प्रजासत्ताकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. २०१२ मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने ब्रॉंझपदक पटकाविले. संदीपच्या या कामगिरीची राज्य शासनाने दखल घेत त्याला प्रतिष्ठेच्या एकलव्य पुरस्काराने सन्मानित केले. आंतरराष्ट्रीय पदकविजेता खेळाडू या नात्याने त्याने २०१२ मध्ये शासकीय नोकरीसाठी राज्य शासनाकडे रीतसर अर्ज केला. मात्र, दहा वर्षांचा काळ लोटूनही अद्याप त्याच्या अर्जावर शासनाने विचार केला नाही. त्यामुळे नाइलाजाने त्याने पोटापाण्यासाठी लग्न समारंभांमध्ये फेटे बांधण्याचा व्यवसाय सुरू केला.

मात्र कोरोना व लॉकडाउनमुळे गेल्या दोन वर्षांपासून विवाह सोहळे जवळपास ठप्प असल्यामुळे संदीपचे खायचे वांधे होऊ लागले. संदीपच्या परिवारात पत्नी, दोन मुले व अर्धांगवायूने आजारी असलेली आई आहे. त्यांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी सध्या संदीपवर आहे. आर्थिक अडचण व कमाईचे दुसरे साधन नसल्यामुळे नाईलाजाने संदीपला फूटपाथवर चहाची टपरी टाकावी लागली. बीसीतून मिळालेले थोडेफार पैसे आणि मित्र व नातेवाईकांकडून उधार घेऊन त्याने नुकतेच नवीन सुभेदार परिसरात छोटेसे दुकान सुरू केले. दिवसभर चहा- पोहे विकुनही मोठ्या मुश्किलीने १०० ते २०० रुपयांची कमाई होते. महागाईच्या काळात एवढ्याशा कमाईत घर चालविणे कठीण जात असल्याचे संदीपने सांगितले. शासकीय नोकरी मिळाल्यास आपली कायमची चिंता मिटेल, असे त्याला वाटते. उल्लेखनीय म्हणजे, दैनिक ‘सकाळ’नेही वेळोवेळी संदीपच्या व्यथा मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र त्याउपरही संदीपला न्याय मिळालेला नाही. दिव्यांगांना ४५ वर्षांपर्यंतच शासकीय नोकरीची संधी आहे. त्यामुळे वय उलटण्यापूर्वी तरी माझ्या अर्जावर शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी त्याची मागणी आहे.

''उपजीविकेकरिता नाईलाजाने चहाची टपरी सुरू करावी लागली. सध्या मला शासकीय नोकरीची खूप गरज आहे. त्यामुळे शासनाने माझ्या अर्जावर गांभीर्याने विचार करावा, अशी माझी एकच मागणी आहे.''

-संदीप गवई, आंतरराष्ट्रीय दिव्यांग तिरंदाज

Web Title: World Archery Sport Players Sandeep Gawai Sale Tea And Pohe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top