Maharashtra Vidhansabha 2019 : 'नाईक' गडात इंद्रनील-नीलय बंधूंत संघर्ष

दिनकर गुल्हाने
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पुसद (जि. यवतमाळ) : विदर्भातील एकमेव राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड असलेल्या पुसद मतदारसंघात भाजपचा "कमळ' फुलविण्याचा मनसुबा आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांच्याविरोधात भाजपने आमदार नीलय नाईक यांना रिंगणात उतरवले आहे. यामुळे नाईक घराण्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे नाईक घराण्यातील इंद्रनील मनोहर नाईक व नीलय मधुकर नाईक या दोन चुलत बंधूंतील ही लढत अत्यंत चुरशीची होईल.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या मर्जीतील आमदार मनोहर नाईक यांनी पुसद विधानसभेत राष्ट्रवादीचा झेंडा सतत उंच ठेवला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्याने विदर्भात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी पडझड झाली. परंतु, पुसद मध्ये मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोहर नाईक 65 हजार मतांनी निवडून आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ते विदर्भातील एकमेव आमदार आहेत. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजतागायत पुसद विधानसभा मतदारसंघावर नाईक घराण्याचे कायम वर्चस्व राहिले आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व विद्यमान आमदार मनोहर नाईक या जनाधार असलेल्या लोकनेत्यांनी पुसदचे सातत्याने नेतृत्व केले. आता आमदार मनोहर नाईक यांनी स्वतः निवडणूक रिंगणात न उतरता कार्यकर्ते, मतदारांचा कानोसा घेत कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांना पुढे केले आहे. नाईक घराण्याचे विधानसभेत नेतृत्व ययाती नाईक व इंद्रनील नाईक यांच्यापैकी कोण करणार, या प्रश्नाचे उत्तरही आता मिळाले असून इंद्रनील नाईक गड लढविणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. निवडणुकांची धुमश्‍चक्री सुरू होताना इंद्रनील नाईक यांनी शिवबंधन बांधण्याची तयारी केली होती. परंतु, शरद पवार यांच्याशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधामुळे व कार्यकर्त्यांचा कल लक्षात घेत आमदार मनोहर नाईक यांनी इंद्रनील नाईक यांना "सिग्नल' दिला नाही. भाजपातील वाढत्या इनकमिंगनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी इंद्रनील यांना उमेदवारी व मंत्रिपदाच्या रेड कार्पेटचे आश्वासक शब्द देत अखेरपर्यंत मनधरणी करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादीत राहण्याची मनोहररावांनी भूमिका घेतली. शुक्रवारी इंद्रनील नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, आमदार मनोहर नाईक व कुटुंबीयांनी ग्रामीण भागात प्रचाराची राळ उठविली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: naik brothers contest against each other in pusad