
गडचिरोली : तत्कालीन भाजप सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना या भाजपच्याच कृपेने तथा तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या संगनमताने मेडीगट्टा प्रकल्प उभारण्यात आला. त्याचे परीणाम आता सिराेंचातील नागरिक भाेगत असून राज्यात भाजपचे सुलतानी सरकार आल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शुक्रवार (ता. २९) पूरपरिस्थितीची पाहणी करण्याकरिता गडचिरोली आले होते. सुरुवातील त्यांनी देसाईगंज, आरमोरी तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर गडचिरोली येथील सर्कीट हॉऊस येथे पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकार परिषदेला माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे महासचिव डाॅ. नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम आदींची उपस्थिती होती. सध्याच्या राज्य सरकारच्या स्वरूपावर टीका करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुंबईत बसून राज्यातील ३७ जिल्ह्यांचा कारभार पाहणे अशक्य आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाचा बोजवारा उडताना दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान होऊनही अद्याप पंचनामे झाले नाहीत. केवळ शेतकऱ्यांचे आधार कार्ड व अर्ज घेण्यात येत आहेत. पंचनामे झाल्याशिवाय मदत कशी मिळणार? असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी करत सरकारने निकष बाजुला ठेवून हेक्टरी ७५ हजारांची मदत शेतकऱ्यांना करावी, अशी मागणी यावेळी केली.
सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बांधलेले मेडीगट्टा या मोठ्या धरणामुळे सिरोंचा येथे मोठी पुरपरिस्थितीत निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले व सिरोंचा तालुक्यातील सुपीक जमीन वाहून गेली आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. लोकांनी महामार्गावर आपली झोपडी टाकून संसार थाटलेला आहे. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करण्यासाठी असे धरण बांधतांना त्याचा दुसऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसणार नाही, याची दक्षता खरेतर तेलंगणा सरकारने घ्यायला हवी होती. हे धरण आता एक मोठी समस्या झाली आहे. या धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल. मात्र तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक इंच जागा देखील पाण्याखाली जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र सद्यस्थितीत आपणास सर्वांना काय हाल झाले हे स्पष्ट दिसत आहे. राज्य सरकारने तातडीने सर्वेक्षण करून मेडीगड्डा प्रकल्पाचा अहवाल द्यावा व विनापरवानगीने बांधण्यात आलेल्या धरणाला डिमॉलिश करण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
वाघांचा बंदाेबस्त करा...
आरमोरी, वडसा तालुक्यात मागील काही महिन्यांत ४३ शेतकऱ्यांचा हल्लेखाेर वाघाने बळी घेतला आहे. या वाघांचा बंदोबस्त वनविभागाने लवकरात लवकर करावा, अन्यथा कॉंग्रेस पक्षातर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल. सुरजागड प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान होत आहे. सुरजागड पहाडावरील हजारो झाडांची कत्तल करून, अवैधरित्या ब्लास्टिंग करून लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा, याकरिता कोनसरी प्रकल्प लवकरात लवकर उभारावा, याकरिता येत्या १७ आॅगस्टला कॉंग्रेस पक्षातर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.