विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंची कौतुकास्पद संकल्पना.. करणार हे अभिमानास्पद काम..  वाचा सविस्तर   

राजकुमार भितकर  
Sunday, 23 August 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या महाराष्ट्रातील ७९ उमेदवारांचा गौरव सोहळा प्रथमच राज्याच्या सर्वोच्च सभागृहातर्फे आयोजित करण्यात आला आहे.

यवतमाळ : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नेहमीच शेतकरी, बहुजन समाज व सर्वसामान्यांसाठी आवाज उठवून त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. देशपातळीवर उत्तुंग यश संपादन करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंतांचा महाराष्ट्राच्या मातीत राज्याच्या सर्वोच्च सभागृहाने सन्मान करणे हा अतिशय कौतुकास्पद पायंडा विधानसभाध्यक्षांनी पाडला आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनी एक कौतुकास्पद संकल्पना मांडली आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या महाराष्ट्रातील ७९ उमेदवारांचा गौरव सोहळा प्रथमच राज्याच्या सर्वोच्च सभागृहातर्फे आयोजित करण्यात आला आहे. विधानसभाध्यक्ष ना.नानाभाऊ पटोले यांच्या संकल्पनेतून होणारा हा अभिनव सत्कार सोहळा २५ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ४ वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन मुंबई येथे होणार आहे.

अधिक माहितीसाठी - कोरडी आत्महत्येच्या निमित्ताने! हे काही आयुष्यावर फुली मारण्याचे वय नव्हते

हा कार्यक्रम महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती श्री.रामराजे नाईक-निंबाळकर,  महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले, राज्याचे मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष श्री.नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री श्री.बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, विधानपरिषद विरोधीपक्ष नेता श्री.प्रविण दरेकर, विधानसभा विरोधीपक्ष नेता श्री.देवेंद्र फडणवीस, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री.सतिश गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. 

ही तर कौतुकाची थाप 

बुध्दीमत्ता, ध्येय, एकाग्रता, अभ्यासूवृत्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेत उज्वल यश मिळवणाऱ्या या गुणवंत विद्यार्थांचा गौरव विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र विधानमंडळातर्फे करण्यात येत आहे. राज्यात विधानमंडळातर्फे असा कार्यक्रम प्रथमच होत आहे. यावर्षी जवळपास 80 उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परिक्षेत सुयश प्राप्त करुन महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विधानमंडळाकडून या यशस्वी उमेदवारांचा गौरव म्हणजे स्वजनाकडून त्यांच्या कर्तृत्वाला दिलेली कौतुकाची दाद असून त्यांच्या भावी उज्वल कारकिर्दीकरीता शुभेच्छा आहेत. 

अधिक वाचा - पतीला करायचे होते प्रेयसीसोबत लग्न; पत्नीने घेतला मग हा निर्णय...

यांच्यासाठी ठरेल प्रेरणा 

सर्वसामान्य परिस्थितीत संघर्ष करून अनेक उमेदवारांनी या परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे त्यांचा सन्मान व्हावा व अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. आपण शासनकर्ती जमत झालो पाहिजे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते. त्यादृष्टीने महाराष्ट्र भरारी घेत आहे. ही परंपरा नेहमी सुरु राहावी अशी भावना महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी व्यक्त केली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nana patole will praise merit students of Central public service commission exam