सभेदरम्यान कॉंग्रेस सदस्यांकडून राष्ट्रगीत!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नागपूर : सभागृहात प्रश्‍नोत्तराच्या तासात अनुकूल उत्तर न मिळाल्याने कॉंग्रेसच्या तीन सदस्यांनी राष्ट्रगीताला सुरू केली. राष्ट्रगीतानंतर कॉंग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. यावरून सत्ताधाऱ्यांनी कॉंग्रेस सदस्यांचा निषेध करीत कारवाईची मागणी केली. त्यामुळे सभेदरम्यान राष्ट्रगीत गायन करणे कॉंग्रेस सदस्यांना महागात पडण्याची शक्‍यता आहे.महापालिकेची सर्वसाधारण सभा आज महाल येथील नगरभवनात पार पडली. सभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात कॉंग्रेसचे कमलेश चौधरी यांनी मनपातील अस्थायी वाहनचालकांना स्थायी करण्यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित केला. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तसेच महापौर नंदा जिचकार यांनी पुढील विषय पुकारल्याने कॉंग्रेस सदस्य संतापले. हरीश ग्वालवंशी, नितीन साठवणे व बंटी शेळके यांनीही महापौरांवर हुकूमशाहीचा आरोप करीत राष्ट्रगीताला प्रारंभ केला. त्यामुळे सभागृहातील सर्वच सदस्य राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे झाले. मात्र, कामकाजादरम्यान अशाप्रकारे राष्ट्रगीत गायनाचा महापालिकेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे. राष्ट्रगीत गायनानंतर कॉंग्रेस सदस्यांनी महापौरांचा निषेध करीत सभात्याग केला. या कृतीवर सत्ताधारी बाकावरील ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. राष्ट्रगीत गायनाची नियमावली आहे. सभेचे कामकाज सुरू असताना अशाप्रकारे राष्ट्रगीत गायन करून कॉंग्रेस सदस्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला. या सदस्यांना नोटीस बजावून दिलगिरी व्यक्त करण्याची सूचना द्यावी, दिलगिरी व्यक्त न केल्यास प्रशासनाने नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी दयाशंकर तिवारी यांनी केली. सभागृहाच्या कामकाजातून ही घटना काढून टाकावी, अशीही मागणी त्यांनी केली. प्रवीण दटके यांनीही एखाद्या विषयाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राष्ट्रगीत गायन करणे योग्य नाही, सर्व कॉंग्रेस सदस्यांना नोटीस द्या, अशी मागणी केली.
राष्ट्रगीताचा अवमान केला नाही ः वनवे
एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर न मिळाल्याने सदस्य संताप व्यक्त करतात अन्‌ महापौर राष्ट्रगीत लावतात. आजही महापौरांनी राष्ट्रगीत लावले, असा समज झाला अन्‌ आम्ही सर्व उभे झालो. आयुक्त, सत्ताधारी, महापौर सारेच उभे झाले. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. उभे राहून राष्ट्रगीताचा आदरच केला, यात कुठेही अवमान नाही, असे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रगीत सदस्यांनी सुरू केले, हे कळलेच नाही. या सर्व घटनेप्रकरणी आयुक्तांना भेटून सांगितले, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National anthem by members of Congress during the session!