राष्ट्रीय पुस्तक मेळ्यांच्या यादीतून नागपूर हद्दपार!

नितीन नायगांवकर
बुधवार, 2 जानेवारी 2019

नागपूर : नऊ वर्षे सलग यशस्वी आयोजन करून लाखो वाचकांना जोडणाऱ्या राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे गेली तीन वर्षे आयोजन नागपुरात होऊ शकलेले नाही. परिणामी देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करणारा नागपूरचा पुस्तक मेळा आता "राष्ट्रीय' यादीतूनही पूर्णपणे हद्दपार झाला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागपूरच्या वाट्याला हे दुर्दैव आले आणि त्याचा फटका प्रकाशक व वाचकांना बसला.

कस्तुरचंद पार्कवर जानेवारीत होणारा राष्ट्रीय पुस्तक मेळा केवळ नागपूर शहराची नव्हे तर विदर्भाची ओळख होऊन बसला होता. आठ दिवसांच्या या मेळ्यात दीडशेच्या जवळपास प्रकाशक सहभागी व्हायचे. अखेरच्या वर्षी तर कॅम्ब्रीजसारखे चार आंतरराष्ट्रीय प्रकाशक यात सहभागी झाल्यामुळे दिल्ली आणि कोलकातानंतर देशात तिसऱ्या क्रमांकाचा पुस्तक मेळा म्हणून ओळख निर्माण झाली होती. पण, नागपूर महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीचे कारण झाले आणि आयोजनाला दृष्ट लागली. अखेरच्या वर्षी तर प्रशासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठी आयोजकांना अक्षरशः चपला झिजवाव्या लागल्या. नागपुरातील प्रकाशकांनी "नॅशनल बुक फेअर' नावाने स्थापन केलेली संस्था स्वतःच्या खिशातून सारा खर्च करू लागली. त्याचा फटका त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाला बसू लागला होता. तीन वर्षांपासून प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने प्रदर्शन झाले नाही. काही दिवसांपूर्वी ही कार्यकारिणीही संपुष्टात आली. आठ दिवसांच्या या पुस्तक मेळ्याला पाच लाख वाचक भेट द्यायचे. जवळपास पावणेदोन कोटीची उलाढाल मेळ्यातून होत होती. देशभरातील नावाजलेले प्रकाशक यात सहभागी व्हायचे. वीस स्टॉलपासून सुरू झालेले प्रदर्शन दीडशे स्टॉलपर्यंत मजल मारून गेले होते. वाचकांना एक वार्षिक पर्वणी या निमित्ताने मिळत होती. पण, नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेतील पानं गळून पडली आणि एका मोठ्या आयोजनाला सर्वांना मुकावे लागत आहे.
दिल्ली, कोलकाता, बंगलोर, पटना येथेही राष्ट्रीय पुस्तक मेळा होतो. पण, नागपूरचा राष्ट्रीय पुस्तक मेळा देशात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. काही कारणांनी तो बंद पडला. पण, प्रशासनाने पाठबळ दिल्यास नागपुरातील प्रकाशक पुन्हा एकत्र येऊन त्याचे यशस्वी आयोजन करण्यास समर्थ आहेत.
- विनोद नांगिया, माजी अध्यक्ष, नॅशनल बुक फेअर  

Web Title: National Book Fair Nagpur expatriates from list