राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे चाललयं तरी काय? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

> जि.प. व पं. स. स्वबळावर लढणार? 
> समान जागा वाटपासंदर्भात कॉंग्रेसशी बोलणी 
> लवकरच जिल्ह्यात दौरा करून उमेदवारांची चाचपणी 
> पक्ष कार्यालयात इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार 

नागपूर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळजवळ महिनाभराचा काळ लोटला आहे. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच काही सुटता सुटेना झाला आहे. भाजप-शिवसेना यांचे तुटल्यानंतर कोणता पक्ष सत्ता स्थापन करेल आणि कोणाला सोबत घेईल याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे. कधी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी-कॉंग्रेस सत्ता स्थापन करेल असे चित्र पाहायला मिळते तर कधी भाजप-राष्ट्रवादीचे नाव समोर येते. यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

आता शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस यांची बोलणी झाली असून, सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शेवटच्या क्षणी काय होईल याचा नेम नाही. हे महिनाभरापासून आपण पाहतोच आलो आहे. कोणता पक्ष कोणत्या पदासाठी आडकाठी टाकेल याचा नेम नाही. महिनाभरापासून पदासाठीच सर्व काही सुरू आहे. मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्री, महसूल खाते यावरून कोण नाराजी व्यक्‍त हे सांगणे कठीण झाले आहे. 

जवळजवळ शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसचे बोलने झाले असले तरी नागपूर जिल्ह्यात होऊ घातलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर लढू शकते. गुरुवारी झालेल्या नागपूर जिल्हा कार्यकारिणीच्या विशेष बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसेच चाललयं तरी काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

नागपूर जिल्ह्यात विधानसभेनंतर जिल्हा परिषद निवडणूक लागणार असल्याचे संकेत मिळत असतानाच अनेकांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयारी चालविली आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते नवनिर्वाचित आमदार माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर, माजी आमदार विजय घोडमारे पाटील व जिल्हा निरीक्षक धनंजय दलाल यांच्या मार्गदर्शनात बैठक घेण्यात आली. 

यावेळी ईश्वर बाळबुधे, राजू राऊत, बंडोपंत उमरकर, अविनाश गोतमारे, चंद्रशेखर चिखले, कमलाकर घाटोळे, संतोष नरवाडे, श्‍याम मंडपे, उज्ज्वला बोढारे, सोनू तितरमारे, सतीश शिंदे, नरेश अरसडे, किशोर चौधरी, राजा आकरे प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीला सर्व फ्रंटल अध्यक्षांनी हजेरी लावली. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले सर्व यावेळी हजर होते, हे विशेष. कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित आमदार अनिल देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. 

लवकरच उमेदवारांची चाचपणी

अनिल देशमुख यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या तयारीला लागले आहेत. त्यांच्या भावनांचा आदर केला जाणार असल्याची ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली. लवकरच जिल्ह्यात दौरा करून उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. नागपूरच्या पक्ष कार्यालयात इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

मित्रपक्ष कॉंग्रेससोबत करणार बोलणी 
निवडणुकीत आघाडीसंदर्भात मित्रपक्ष कॉंग्रेससोबत बोलणी केली जाईल. जागा वाटपामध्ये सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र व स्वबळावर लढण्याची तयारी करेल. 
- बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist Congress fight on its own?