esakal | राष्ट्रवादीतील निष्ठावंत अस्वस्थ

बोलून बातमी शोधा

maharashtra vidhansabha bhavan}

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते व प्रख्यात वक्ते अमोल मिटकरी यांना विधान परिषदेवर पाठवून आमदारकीची संधी देण्च्यायात येणार असल्याचे संकेत दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये घुसफूस सुरू आहे. 

राष्ट्रवादीतील निष्ठावंत अस्वस्थ
sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विदर्भातील युवा नेत्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातून पक्षाचे प्रवक्ते व मुलखमैदानी तोफ अमोल मिटकरी यांना विधान परिषदेची आमदारकी मिळण्याचे संकेत आहेत. या निर्णयाने अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे निष्ठावंत व अनेक वर्षांपासून पक्षासाठी तन-मन-धनाने काम करीत असलेल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.


अकोला जिल्ह्यात शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवणारा मोठा वर्ग आहे. यात काही तरूण नेत्यांचाही समावेश आहे. डॉ. संतोषकुमार कोरपे, प्रा. विश्‍वनाथ कांबळे, डॉ. आशा मिरगे, श्रीकांत पिसे पाटील, युसूफ अली, जावेद जकेरिया, विजय देशमुख यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षासाठी अनेक वर्षांपासून काम केले आहे. आजही ते निष्ठेने पक्षासाठी काम करीत आहेत. डॉ. आशा मिरगे यांनी प्रदेश कार्यकारिणीत प्रवक्तेपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा किल्ला ग्रामीण भागात समर्थपणे पेलण्याचे काम आजही डॉ. कोरपे करीत आहेत.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकत ठेवला आहे. युसूफ अली यांनी पक्षासाठी अनेक वर्ष काम केले. पद असो अथवा नसो ते सातत्याने काम करीत आले आहेत. मूर्तिजापूरमध्येही पक्षासाठी काम करणाऱ्या नेत्यांची फळी आहे. प्रा. तुकाराम बिडकर यांनीही पक्षावरील निष्ठा आजपर्यंत कमी होऊ दिली नाही. राजीव बोचे सारखे नेते संधीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आता सत्तेत आल्यानंतर या नेत्यांना कुठेतरी आपण डावलल्या जात असल्याची भावना निर्माण होत आहे.

पक्ष संघटन वाढविण्यासाठी तरुणांना संधी देण्याची पक्षाच्या नेत्यांच्या निर्णयाचे स्वागत या नेत्यांनी मनापासून केले असले तरी डावलल्या जात असल्याची भावना त्यांना अस्वस्थ करीत आहे. पक्ष संघटना वाढीसाठी सहाय्य ठरू शकणाऱ्या नेत्यांना प्रोत्साहन देण्याची हीच खरी वेळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निष्ठावंतांमध्ये डावल्या जात असल्याची भावना निर्माण झाल्यास त्याचे परिणामही पक्ष संघटनेवर दिसून आले तर आश्‍चर्य वाटणार नाही.

स्थानिक पातळीवर हवे प्रोत्साहन
अकोला जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे दोनच सदस्य होते. त्यापैकी महिला सदस्य प्रतिभा अवचार यांनी राष्ट्रवादीला सोडून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. दुसरे सदस्य पुंडलिकराव अरबट हे पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जिल्हा परिषदेमध्ये पद घेवून मोकळे झाले होते. महापालिकेत पाचच नगरसेवक आहेत. त्यातही विजय देशमुख यांचाच गट प्रभावी आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांना प्रोत्साहित करणे आवश्‍यक असल्याची भावना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे.