file photo
file photo

बापरे! नवेगावबांध परिसरात "या' आजाराने काढले डोके वर...नागरिकांनी काळजी घ्यावी

नवेगावबांध (जि. गोंदिया) : येथील प्रभाग क्रमांक एकमधील एका आठ वर्षीय मुलीला मलेरिया झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे परिसरातील काही गावांमध्ये 5 ते 7 हिवतापाचे रुग्ण आढळल्याची माहिती आहे. कोरोना विषाणूपाठोपाठ हिवतापाचा आजार परिसरात बळावतो की काय, अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

येथील बसस्थानक परिसरातील एका मुलीला हिवताप झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्या मुलीवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरातील काही गावांमध्येसुद्धा पाच ते सात हिवतापाचे रुग्ण निघाल्याची माहिती आहे.

आता पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया यांसारखे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नवेगावबांध परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र पवनीधाबे येथे काही दिवसांपूर्वी हिवतापाची लागण झालेल्या दोन रुग्णांनी उपचार घेतला होता, हे येथे उल्लेखनीय आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना करा

साथीच्या रोगाची बाधा नागरिकांना होऊ नये व ती गावात पसरू नये, याच्या प्रतिबंधासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने डीडीटी फवारणी व डास प्रतिबंधक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

नागरिकांनी घ्यावी काळजी

नागरिकांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरात आजूबाजूला पाणी साठू देऊ नये. एक दिवस कोरडा दिवस पाळावा. टाकाऊ वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नये. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घराबाहेर डबक्‍यात साचलेल्या पाण्यात वाहनाचे जळालेले इंजिन ऑइल टाकावे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून आल्यास जवळच्या आशासेविका, आरोग्यसेविका, आरोग्यकर्मचारी किंवा सरकारी रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन पवनी धाबे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मेंढे यांनी केले.


डीडीटी फवारणीची मागणी
नवेगावबांध येथे मलेरियाचा एक रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. प्रभाग क्रमांक एकमधील या परिसरात प्रतिबंधात्मक फवारणी ग्रामपंचायतीने केली आहे. गावात साथरोग पसरू नये म्हणून जिल्हा हिवताप अधिकारी यांना डीडीटी फवारणीची मागणी करण्यात येईल.
- अनिरुद्ध शहारे, सरपंच, नवेगावबांध.

 


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com