नवोदय बॅंक घोटाळा, तत्कालीन सीईओ चट्टे जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक घोटाळा प्रकरणात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर चट्टे (47) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे महालातील नटराज टॉकीजमागील घरूनच त्याच्या मुसक्‍या आवळल्या. घोटाळ्यात त्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सोबतच प्लॉट खरेदीसाठी कोणतेही तारण न ठेवताच त्याने स्वत:च्या नावे कर्ज घेतले. परतफेड मात्र केली नसल्याची बाब तपासात पुढे आली आहे. 

माजी आमदार अशोक धवड अध्यक्ष असलेल्या नवोदय बॅंकेत कोट्यवधीचा घोटाळा उघडकीस आला आहे. चट्टे हा 2007 ते 2012 दरम्यान बॅंकेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होता. त्याने फरार आरोपी सचिन मित्तल व बालकिशन गांधी यांच्या ग्लॅडस्टोन समूह, हिंगल समूह, झाम समूह, जोशी समूहाला तसेच अन्य कर्जदारांची कर्जफेडीची क्षमता न तपासता कर्ज मंजूर केले. तसेच तारण म्हणून सादर केलेल्या मालमत्तेची कोणतीही पडताळणी न करता बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड, संचालक मंडळ व कर्जदारांसोबत हातमिळवणी व संगनमत करून त्यांना बॅंकेच्या एक्‍सपोजर लिमिटपेक्षा कितीतरी पटीने जास्त कर्ज मंजूर केले. नोव्हेंबर 2009 मध्ये प्लॉट खरेदीसाठी स्वत: साडेसात लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतले. त्यासाठी मालमत्ता मात्र गहाण ठेवली नाही. काही प्रमाणात त्यांनी परतफेड केली खरी, पण 16 मे 2012 रोजी नोकरी सोडल्यापासून परतफेड बंद केली. जून 2017 पर्यंत चट्टेकडे मुद्दल व व्याजाचे एकूण 5.55 लाख रुपये थकीत होते. गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाचे पथक चट्टेच्या मागावर होते. तो घरी असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे बुधवारी छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 22 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
बॅंकेच्या लेखा परीक्षण अहवालात 38.75 कोटींच्या अपहाराची बाब अधोरेखित झाली आहे. या प्रकरणी जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रीकांत सुपे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navoday bank scam, ceo arrested